भरधाव मोटारीच्या धडकेत बँक व्यवस्थापक ठार 
सांगली

Sangli Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बँक व्यवस्थापक ठार, पत्नी गंभीर

वडगाव-हातकणंगले मार्गावर मिणचेजवळ भीषण अपघात : मृत मिरज येथील

पुढारी वृत्तसेवा

पेठवडगाव : भरधाव मोटारीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दीपक रावसाहेब शिंदे (वय ४५, रा. मिरज, जि. सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी आशाराणी शिंदे (४०) गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास वडगाव-हातकणंगले मार्गावर मिणचे येथे घडला. मूळचे तळसंदे येथील दीपक शिंदे हे एचडीएफसी बँकेच्या सांगली शाखेत व्यवस्थापक होते.

दीपक शिंदे हे पत्नी, मुलगा हर्षवर्धन आणि वडील रावसाहेब यांच्यासह दोन दुचाकींवरून रविवारी आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी कोल्हापूरला गेले होते. परत येत असताना पेठवडगाव येथील सासुरवाडीत त्यांनी मुक्काम केला. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सर्वजण मिरजेकडे निघाले. मिणचेच्या हद्दीत समोरून येणाऱ्या मोटारने शिंदे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. शिंदे दुचाकीसह दूर फेकले गेले. यामुळे त्यांच्या डोक्यासह शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेल्या त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या.

अपघाताची माहिती समजताच वडगाव येथील परिचितांनी मोठी गर्दी केली होती. पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर तळसंदे येथे दीपक शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातप्रकरणी विजय बाळासाहेब यादव (रा. पेठवडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटारचालक साहिल राजू फातल (२४, रा. यड्राव, ता. शिरोळ) याच्याविरुद्ध वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार इंद्रजित शिंदे पुढील तपास करीत आहेत.

मुलगा व वडिलांच्‍या डोळ्यांदेखत अपघात

दीपक शिंदे हे पत्नीसह एका दुचाकीवर तर मुलगा आजोबांसह दुसर्‍या दुचाकीवरून जात होते. मिणचेच्या हद्दीत कुटुंबीयांच्या डोळ्यांदेखत दीपक यांचा जागीच मृत्यू झाला तर आशाराणी गंभीर जखमी झाल्या. या घटनेने कुटुंबीयांनी घटनास्थळी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT