सांगली

Sangli Rape Case: बलात्कारानंतर सांगलीत कॅफेचे 'शटर डाऊन'

कारवाईची धास्ती : शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून पर्दाफाश; पोलिसांसमोरच केला पंचनामा

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : विश्रामबाग परिसरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेचे पडसाद उमटताच आणि पोलिसांच्या संभाव्य कारवाईच्या धास्तीने शहरातील बहुतेक कॅफे चालकांनी शटर खाली ओढून पलायन केले.

शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक नितीन चौगुले व कार्यकर्त्यांनी शहरातील विविध कॅफेंवर धडक मारली. विश्रामबाग येथील 'एसपी' ऑफिससमोरील कॉम्प्लेक्स, महावीर उद्यान आणि विलिंग्डन महाविद्यालयासमोरील कॅफेंची तपासणी केली असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. थेट पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या समोरच अवैध कॅफेंनी विळखा घातल्याचे आणि तेथे चोरीछुपे गैरप्रकार सुरू असल्याचे संघटनेने पोलिसांना दाखवून दिले, ज्यामुळे पोलिसही निरूत्तर झाले होते.

​महावीर उद्यानासमोरील एका तळघरातील कॅफेत तसेच विलिंग्डन कॉलेजसमोरील एका कॅफेच्या पोटमाळ्यावर पडदे टाकून, छोटे बिछाने व टेबल लावून युगुलांसाठी बसण्याची सोय केल्याचे कार्यकर्त्यांना आढळून आले. विश्रामबागचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित कॅफे चालकाला सज्जड दम दिला आणि पडदे तत्काळ काढून टाकण्यास सुनावले.

गर्भनिरोधक साहित्य

​विश्रामबाग येथील आलदर चौकाजवळील एका कॅफेचालकाने शटर बंद करून पळ काढला होता, मात्र त्याच्या कॅफेच्या बाहेरच गर्भनिरोधक साहित्याचा खच पडल्याचे कार्यकर्त्यांनी पोलिसांना दाखवून दिले. तसेच, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका कॅफेमध्ये कार्यकर्त्यांनी पोलिसांसह झडती घेतली असता, तेथेही गर्भनिरोधक साहित्य सापडले.

सांगलीतील बेकायदा कॅफेवरती पोलिसांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे या कॅफेंना महापालिकेकडून परवानगी देण्यात आली होती का याची माहिती मागविलेली आहे. याप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.
- सुधीर भालेराव, पोलिस निरीक्षक विश्रामबाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT