सांगली : दहा हजार रुपये देण्यास नकार दिल्याने एका बांधकाम साहित्य पुरवणाऱ्या व्यावसायिकावर गुप्तीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्याशिवाय त्यास दगडाने देखील मारहाण करण्यात आली. विजयनगर येथील हसनी आश्रम परिसरात ही घटना घडली. यामध्ये गणेश श्रीमंत पाटील (वय 38, रा. पूर्वा गार्डनच्या पाठीमागे, हसनी आश्रमनजीक, वानलेसवाडी, सांगली) हा व्यावसायिक जखमी झाला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी गणेश पाटील हे मंगळवारी रात्री थांबले होते. संशयित सुनील मासाळ आणि आदर्श लोखंडे (दोघे रा. वानलेसवाडी, सांगली) आणि अन्य एक अनोळखी इसम हसनी आश्रम परिसरात आले. तेथे गणेश पाटील यांच्याकडे त्यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास पाटील यांनी नकार दिला. त्यामुळे तिघांनी मारहाण केली. पोलिसांनी तिघा संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.