सांगली : येथील मध्यवर्ती बसस्थानक पायाभूत सुविधांपासून वंचित तर आहेच, शिवाय चोर्या-मार्यांचे प्रमाणही वाढले आहे. चार-पाच महिन्यांत महिलांच्या अंगावरील जवळपास दहा लाखांचे दागिने लंपास झाले. त्याबरोबरच बसस्थानकाला खोक्यांचा विळखा पडल्याने रात्री याठिकाणी गुन्हेगारांचा अड्डा बनत चालला आहे. महापालिकेबरोबर पोलिस यंत्रणेचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे.
सांगली बसस्थानकावरून रोज किमान दहा ते बारा हजार प्रवाशांची ये-जा असते. बस संख्या कमी असल्यामुळे याठिकाणी बसला मोठी गर्दी दिसून येते. त्यातच नादुरुस्त गाड्यांचेही प्रमाण अधिक आहे. गर्दीमुळे गुन्हेगारांचे फावत आहे. गेल्या पाच महिन्यांत या बसस्थानकावरून सुमारे दहा लाखांचे दागिने चोरीस गेले आहेत. यामध्ये फेब्रुवारी महिन्यात सुमारे पावणे चार लाखांचे, नोव्हेंबर 2024 मध्ये सव्वा दोन लाखांचे, ऑक्टोबरमध्ये 25 हजारांचे साहित्य, तर सप्टेंबरमध्ये बसस्थानकावरून 60 हजारांची रोकड पळवण्याचा प्रकार घडला. दिवसाढवळ्या चोरीच्या वाढलेल्या घटना चिंताजनक बनल्या आहेत.
मुख्य बसस्थानकाला खोक्यांचा विळखा पडला आहे. अनेक हातगाड्या दरवाजाला लावलेल्या दिसतात. रात्री या खोक्यांच्या परिसरात गुन्हेगारांना लपून बसणे सोयीचे झाले आहे. वाहक, चालक यांच्या विश्रामगृहाचीही दुरवस्था झाली आहे. दरवाजे, खिडक्या मोडलेल्या आहेत. अनेकवेळा याठिकाणी भुरट्या चोर्याही झाल्या आहेत. बसस्थानक आवाराला असलेली कंपाऊंड भिंत अनेक ठिकाणी पडलेली आहे. त्यातून आत प्रवेश करणे सहज शक्य आहे. बंद पडलेल्या बसेसही याठिकाणी दोन-तीन दिवस पडून असतात. बस स्थानकामध्ये दोन पोलिसांची कायम नियुक्ती असते; मात्र कर्मचारी नसल्याचे कारण सांगत हे पोलिस बर्याचवेळा गैरहजर असतात. खासगी व एसटीचे आठ ते दहा सुरक्षा रक्षक आहेत; मात्र ही संख्या खूपच अपुरी आहे. त्यामुळे गुन्हेगारीला वाव मिळत आहे. बसस्थानक परिसरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही कमी क्षमतेचे असल्याचे सांगितले जाते.
स्थानकातील पोलिस कक्ष रिकामेच
बसस्थानकामध्ये रात्री भटक्या लोकांचा आश्रय
मद्यपींचा रात्रीचा वावर वाढलाय
खोक्यांच्या विळख्यामुळे परिसरात अंधार
सीसीटीव्ही ठरताहेत निष्क्रिय
चालक, वाहकांच्या विश्रामगृहाचे दरवाजे, खिडक्या मोडलेल्या
कर्नाटक बसचे चालक, वाहक रात्री रोकडसह बसमध्येच झोपतात
बसस्थानकामध्ये स्वच्छता, पाणी, स्वच्छतागृहाची दुरवस्था
बस स्थानकातील कॅन्टिन अनेक वर्षांपासून बंद