शिराळा : भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील आवळ ओढ्याजवळ शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास बस आणि दूध टँकरची समोरासमोर धडक झाली. अपघातात २३ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. टँकरचालक तेजस कांबळे (रा. सुरुली) आणि श्रेया पाटील (रा. भाटशिरगाव) अशी जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बस (क्र. एमएच ११ बीएल ९३११) ही कांदे गावाकडून शिराळ्याच्या दिशेने येत होती, तर दूध टँकर (क्र. एमएच १० डीटी ८९००) शिराळ्याहून भाटशिरगावकडे चालला होता. आवळ ओढ्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरात धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन एसटीतील जखमींना बाहेर काढले व शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
जखमींमध्ये अनुष्का जगताप, श्रेया पाटील, निकिता गुरव, जान्हवी गुरव, अक्षता सांगरुळे, रसिका देसाई, आयुष अस्वले (सर्व रा. भाटशिरगाव), तनुजा चिंचोले, ऐश्वर्या पाटील, लक्ष्मी सावंत, मालू गोसावी, मंगल निंबाळकर, सायली पाटील, साक्षी देसाई, गायत्री सपाटे, ज्योती साठे (सर्व रा. कांदे), आदित्य साळुंखे, सानिका लोखंडे, आराध्या पाटील (सर्व रा. चिखली), एसटी चालक अरविंद लुगडे आणि टँकरचालक तेजस कांबळे यांचा समावेश आहे.