दिघंचीत बस हॉटेलच्या शेडमध्ये घुसली 
सांगली

Sangli Accident| दिघंचीत बस हॉटेलच्या शेडमध्ये घुसली

दुचाकीस्वार जखमी; हॉटेलचे शेड, फलक, टेबल-खुर्च्यांसह बस व दुचाकीचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : दिघंची-पंढरपूर रस्त्यावर समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट 'हॉटेल अथर्व गार्डन'च्या शेडमध्ये घुसली. शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबररोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे, अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या अपघातात दुचाकीस्वार शिवाजी जयवंत अलदर (वय ५०, रा. गोमेवाडी, ता. आटपाडी) हे जखमी झाले आहेत. बसचालक सीताराम कृष्णा माळी (रा. मापटेमळा, ता. आटपाडी) हे आटपाडी आगाराची बस (क्र. एमएच १४ एमएच ३०६३) पंढरपूरकडून आटपाडीकडे घेऊन येत होते.

दिघंची येथील हॉटेलजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच २८ एडब्ल्यू ९६४१) वाचवण्याच्या प्रयत्नात बसची दुचाकीला धडक बसली. त्यानंतर नियंत्रण सुटलेली बस रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन हॉटेलच्या शेडमध्ये घुसली. यावेळी हॉटेलच्या काउंटरजवळ नितीन मोरे आणि त्यांचे बंधू निनाद मोरे उभे होते, ते थोडक्यात बचावले.

या धडकेत दुचाकीचे हँडल तुटले, तर बसच्या चालकाच्या बाजूची समोरील काच फुटली आहे. तसेच हॉटेलचे शेड, नामफलक आणि टेबल-खुर्च्यांचेही नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आणि घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या प्रकरणी हॉटेल व्यावसायिक नितीन यशवंत मोरे (वय ५२, रा. दिघंची) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT