बैलांचा बाजार File Photo
सांगली

Sangli News| दुष्काळाचे सावट; ईश्वरपूरच्‍या संभुआप्पा-बुवाफन उरूसातील बैलांचा बाजार रद्द!

पशुपालक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांची बाजाराकडे पाठ

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : पश्चिम महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असलेल्या येथील संभुआप्पा बुवाफन उरूसानिमित्त येथे भरणाऱ्या बैल बाजारावर दुष्काळाचे सावट आहे. दुष्काळामुळे या बैल बाजारात केवळ चारच बैल दाखल झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीने हा बाजार व जनावरांचे प्रदर्शन रद्द केले आहे. जनावरांअभावी बाजार रद्द करण्याची बाजाराच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.

प्रसिद्ध संभुआप्पा-बुवाफन उरूसाची ओळख म्हणजे येथे भरणारा पारंपरिक बैल बाजार आहे. कोरोना काळ वगळता या बैल बाजारात आजपर्यंत कधीही खंड पडलेला नाही. मात्र यंदा दुष्काळामुळे बाजार तसेच जनावरांचे प्रदर्शन रद्द करण्याची नामुष्की कृषी उत्पन्न बाजार समितीवर आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांची बाजाराची परंपरा यंदा खंडित होणार असून शेतकरी, पशुपालक आणि जनावरांच्या व्यापाऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

संभुआप्पा-बुवाफन उरूसाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या उरूसाच्या निमित्ताने भरणारा बैल बाजार हा परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी महत्त्वाची पर्वणी मानला जातो. या बाजारात बैल, गाई, म्हशी यांसह विविध जनावरांची खरेदी-विक्री होत असते. सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर तसेच कर्नाटक राज्यातील विविध भागांतून पशुपालक आणि व्यापारी या बाजारासाठी येत असतात. पंधरा दिवसात या बाजारात आठ ते दहा कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या बाजारावरच संकट ओढवले आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चाऱ्याची उपलब्धता आणि जनावरांच्या देखभालीचा वाढता खर्च यामुळे पशुपालक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर जनावरांची आवक होणे शक्य नसल्याने भरणारे जनावरांचे प्रदर्शनही बाजार समितीने रद्द केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT