बुधगाव : सांगलीतील बहुचर्चित शेरीनाल्याचे सांडपाणी शेतीसाठी वाहून नेणारी धुळगाव योजनेची पाईपलाईन आता नागरिकांसाठी 'वॉटरबॉम्ब' ठरू लागली आहे. बुधवारी पहाटे ३ च्या सुमारास गावकरी गाढ झोपेत असताना अचानक तब्बल २२ घरांमध्ये हे दुर्गंधीयुक्त सांडपाणी शिरले. घरातील फ्रीजचा प्रवाह पाण्यात उतरल्याने विजेचा धक्का बसल्याने काही जणांना जाग आली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. यामुळे ग्रामस्थांची मोठी तारांबळ उडाली.
सांगली ते कुमठेफाटा यादरम्यान सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामादरम्यान धुळगावकडे जाणारी पाईपलाईन काही ठिकाणी फुटली होती. त्यावेळी शेरीनाल्याचे पंप बंद असल्याने गळती लक्षात आली नाही. बुधवारी पहाटे अचानक पाण्याचा दाब वाढल्याने सांडपाणी थेट नागरी वस्तीत शिरले. झोपेत असताना घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांना अंथरूण-पांघरूण गोळा करण्याचीही संधी मिळाली नाही, परिणामी संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
सुमारे २० वर्षांपूर्वी शेरीनाल्याचे पाणी प्रक्रिया करून धुळगावला शेतीसाठी देणारी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, यासाठी वापरलेले लोखंडी पाईप जीर्ण झाले असून एअर व्हॉल्व्हही खराब झाले आहेत. रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम करताना जुन्या पाईपलाईनला धक्का लागल्याने गळती सुरू झाली आहे. ही पाईपलाईन रस्त्याच्या बाजूला घेणे गरजेचे होते; मात्र तसे न केल्याने समस्येत आणखी भर पडली आहे.
तसेच, बुधगावात ओढ्याकडील मोठ्या गटारीवर पूल बांधण्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. तिथे पाणी तुंबल्याने दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट घरांमध्ये शिरल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. काँक्रीट रस्ता आणि गटाराचे काम तातडीने पूर्ण करावे, तसेच नुकसानग्रस्त रहिवाशांना योग्य भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.