बुधगावसह चार गावांत कडकडीत बंद 
सांगली

Sangli News : बुधगावसह चार गावांत कडकडीत बंद

इंगळे अपहरण प्रकरण : दडपशाहीने केलेली सभापती निवड रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

पुढारी वृत्तसेवा

बुधगाव : नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण करण्यात आले. या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बुधगाव, बिसूर, खोतवाडी, वाजेगाव या गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढून जोरदार निदर्शने केली.

बुधगाव पंचायत समिती गणातून निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित सदस्य पांडुरंग कृष्णा इंगळे यांचे सभापती निवडीपूर्वी एक दिवस बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले. सभापती निवड झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. या घटनेमुळे मिरज पंचायत समितीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. जास्त संख्याबळ असूनही भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधकांनी डाव साधला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी आरोप केला की, मिरज पंचायत समितीमध्ये दडपशाहीने महाविकास आघाडीने सत्ता मिळवली असून हा एकप्रकारे लोकशाहीचा खून झालेला आहे. ही सभापती आणि उपसभापती निवड बेकायदेशीर असून भाजप-शिवसेना युतीला सत्तेपासून रोखण्यासाठी जिल्ह्यात नवीन अभद्र युती तयार झाली आहे. शिवसेनेच्या सदस्याचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करून त्याला मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कट-कारस्थान केले, त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि दडपशाहीने झालेल्या या निवडी रद्द करण्यात याव्यात यासाठी शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करण्यात आल्याचे यांनी सांगितले.

बसस्थानक येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन गावातील प्रमुख मार्गांवर मोटरसायकल रॅली काढण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी तंटामुक्त गाव समितीचे उपाध्यक्ष रामदास पाटील, माजी सरपंच दत्ता पाटील, सतीश मस्के, सुनील आवळे, अरविंद पाटील, मोहन माने, अजिंक्य इंगळे, भूषण गुरव, रावजी गोसावी, विकी गोसावी, शीतल विभुते आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT