सांगली : कामकाज बंद असलेल्या मच्छीमारी सहकारी संस्थेचे पुनर्जीवन करून निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या सहायक निबंधक (दुग्ध) कार्यालयातील लिपिकावर आणि लाच देण्यास प्रोत्साहन देणाऱ्या एका निवृत्त अधिकाऱ्यावर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.
सुरेश बाळासाहेब पाटील (वय ५५, वर्ग ३ लिपिक, सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), सांगली-मिरज, रा. बागणी, ता. वाळवा) आणि सुरेश विठ्ठल लोंढे (वय ६४, निवृत्त लेखापरीक्षक श्रेणी-१, सध्या सहकार विभाग अवसायक, रा. शशिकला अलंकार कॉलनी, मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिराळा तालुक्यातील पुनवत येथील पुनेश्वर मच्छीमारी सहकारी संस्थेचे कामकाज बंद आहे. या संस्थेचे सभासद होण्यासाठी २५ वर्षीय तक्रारदाराने प्रयत्न सुरू केले होते. संस्थेचे चेअरमन व सभासदांनी संस्था पुनर्जीवित करण्याबाबत अर्ज दाखल केला होता. या पुनर्जीवन सुनावणीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी मुंबई येथील कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह मिरज कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी अडीच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती दोन लाख रुपयांमध्ये काम करण्याचे ठरले होते. यापूर्वी घेतलेले एक लाख रुपये वळते करून उर्वरित एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी लिपिक सुरेश पाटील यांनी केली होती. या संभाषणामध्ये लोंढे याने सहभाग घेऊन लिपिक पाटील यांना तसेच मुंबई कार्यालयात काम करून घेण्यासाठी लाच देण्यास तक्रारदारास प्रोत्साहन दिले. तक्रारदाराने याप्रकरणी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पथकाने ३१ ऑगस्ट आणि ४ सप्टेंबर रोजी पडताळणी केली असता, लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोन्ही संशयितांविरोधात मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली एसीबीच्या पोलिस उपअधीक्षक यास्मीन इनामदार, पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण व त्यांच्या पथकाने केली.