तासगाव : सावळज (ता. तासगाव) येथे मैत्रिणीचा व्हिडीओ तयार करून समाजमाध्यमावर व्हायरल केल्याच्या संशयावरून एकाला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तासगाव पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी आकाश काशिनाथ शिरतोडे (वय 25, रा. सावळज) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी राज गजानन फासे, दीक्षांत गजानन फासे व कृष्णत दत्तात्रय फासे (तिघे रा. सावळज) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी आकाश हा सावळज-डोंगरसोनी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये गेला होता. यावेळी आपल्या मैत्रिणीचा व्हिडीओ तयार करून समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केल्याच्या संशयावरून संशयित राज याने फिर्यादी आकाश याला शिवीगाळ करून फरशीने डोक्यात हल्ला केला. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. ‘तुला आता सोडतो, पुन्हा नादी लागलास तर जिवे मारीन’, अशी धमकी दिली. संशयित दीक्षांत फासे व कृष्णत फासे याने आकाश याला छातीवर व पाठीवर लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.