सांगली

Sangli Loadshedding: बोरगावात लोडशेडिंगमुळे संताप

शेतकऱ्यांनी पॉवर हाऊसचे गेट पाडले; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वीजपुरवठा पूर्ववत

पुढारी वृत्तसेवा

बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील शिंदे मळा परिसरात गेल्या चार महिन्यांपासून दररोज रात्री लोडशेडिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या अघोषित वीज कपातीविरोधात नागरिकांचा संताप अखेर उफाळून आला.

सोमवारी रात्री नऊच्या सुमारास संतप्त ग्रामस्थांनी बोरगाव येथील महावितरणच्या पॉवर हाऊसवर धडक दिली. तब्बल दोन तास चर्चा करूनही रात्री अकरा वाजेपर्यंत वीज सुरू न झाल्याने आणि अधिकाऱ्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त जमावाने पॉवर हाऊसचे मुख्य गेट पाडून आत प्रवेश केला. त्यानंतरच प्रशासनाने तातडीने वीजपुरवठा पूर्ववत केला. यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या मध्यस्थीमुळे पुढील अनर्थ टळला.

सध्या राज्यभरातून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे दिंड्या मार्गस्थ होत आहेत. एकीकडे शासन वारकऱ्यांना सर्व सोयीसुविधा देण्याच्या घोषणा करत असताना, दुसरीकडे बोरगाव येथील साई मंदिरात मुक्कामासाठी आलेल्या शिराळा तालुक्यातील अंत्री येथील पायी दिंडीला मात्र वीज नसल्यामुळे अंधारातच भजन-कीर्तन करावे लागले. एवढेच नव्हे, तर चारचाकी वाहनांचे दिवे लावून त्या प्रकाशात वारकऱ्यांना जेवण करावे लागल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. रात्रीचा मुक्काम याच परिसरात असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी वीज मंडळाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.

शिंदे मळा परिसरात सायंकाळनंतर कोणत्याही वेळी पूर्वकल्पना न देता वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत असून, शेती क्षेत्रात बिबट्या, साप व इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने नागरिकांना रात्री जागून काढाव्या लागत आहेत. महावितरण कार्यालयात अनेकदा प्रत्यक्ष भेटी, निवेदने देऊनही कोणतीही दखल न घेतली गेल्याने नागरिकांचा संयम सुटला आणि हे आंदोलन उग्र झाले.

अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत अधिकारी व ग्रामस्थांची लवकरच संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक उदयसिंह शिंदे, माजी नगरसेवक सदानंद पाटील, विवेक पिसाळ, सागर शिंदे, अयुब जमादार, राहुल जाधव, शहाजी पाटील, युसुफ जमादार, सचिन शिंदे यांच्यासह शेकडो नागरिक व तरुण सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT