जत : हळ्ळी-बालगाव (ता. जत) येथे बोर नदीपात्रातून अनधिकृतपणे वाळू उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल व पोलिसांच्या संयुक्त पथकाने शनिवारी सायंकाळी कारवाई केली. या कारवाईत विनानंबरचा ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली.
कारवाईदरम्यान वाळू भरणारे कामगार आणि ट्रॅक्टरचालक पसार झाल्याची माहिती आहे. हळ्ळी-बालगाव येथील बोर नदीपात्रातून अनधिकृतपणे वाळू उत्खनन करून तिची वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार महसूल व पोलिसांच्या संयुक्त पथकाने नदीपात्रात छापा टाकला. यावेळी ट्रॅक्टरमध्ये सुमारे एक ब्रास व नदीपात्रात उत्खनन केलेली सुमारे १८ ते २० ब्रास वाळू आढळून आली.
कारवाईत मंडल अधिकारी सैपान जातगार, उमदी ग्राम महसूल अधिकारी राजू इंगळे, ग्राम महसूल अधिकारी उदय गुरव, ग्राम महसूल अधिकारी विलास संकपाळ, हळ्ळी व बालगाव येथील पोलिस पाटील, कोतवाल तसेच उमदी पोलिसांच्या पथकाने सहभाग घेतला. जप्त केलेला ट्रॅक्टर व ट्रॉली पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी अप्पर तहसील कार्यालय, संख येथे जमा करण्यात आली आहे.