‘पदवीधर’, ‘शिक्षक’साठी भाजपची मोर्चेबांधणी 
सांगली

Sangli News : ‘पदवीधर’, ‘शिक्षक’साठी भाजपची मोर्चेबांधणी

ग्रामीण, मध्य मंडलातील पदाधिकाऱ्यांची बैठक

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना सांगलीतून मोठे मताधिक्य देण्यासाठी भाजपने संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. निवडणुकीच्या नियोजनासह कार्यकर्त्यांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी शुक्रवारी भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात ग्रामीण मंडल आणि मध्य मंडलातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटनेची तयारी, मंडलनिहाय नियोजन आणि कार्यकर्त्यांवर सोपविण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस आ. सुधीर गाडगीळ, भाजप सांगली शहर जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, ग्रामीण मंडलाध्यक्ष संतोष सरगर, मध्य मंडलाध्यक्ष राहुल नवलाई, पदवीधर निवडणूक संयोजक सुहास कलघटगी, सांगली ग्रामीण मंडल प्रभारी निखिल गायकवाड, नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांच्यासह भाजपचे विविध मंडलांतील पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रभावी कामगिरी करण्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया अधिक नियोजनबद्ध करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. ग्रामीण आणि मध्य मंडलातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात समन्वयाने काम करावे, मतदारांशी संपर्क वाढवावा आणि निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर पक्षाची यंत्रणा सक्रिय ठेवावी, यासंदर्भात चर्चा झाली. निवडणूक प्रक्रियेत बूथस्तरावरील नियोजन, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि संघटनात्मक यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी यांना महत्त्व देण्यात आले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखून नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली. मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवणे, संघटनेच्या माध्यमातून प्रचाराचे नियोजन करणे आणि निवडणुकीशी संबंधित कामांचा नियमित आढावा घेणे, या बाबींवरही चर्चा करण्यात आली. ग्रामीण व मध्य मंडलातील पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करून पक्षाची निवडणूक यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने बैठकीत विचारविनिमय केला. पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना सांगलीतून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT