Pudhari News Network
सांगली

Sangli Politics: भाजपला विजयासाठी आणखी 113 मतांची गरज

शिवसेना किंवा राष्ट्रवादीशिवाय विजय दुरापास्त; भाजपविरोधात सर्वपक्षीय मोट बांधली जाणार का?

पुढारी वृत्तसेवा
उध्दव पाटील

सांगली : विधानपरिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. एकूण 853 मतदारांच्या या निवडणुकीत विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 427 मतांची गरज आहे. संख्याबळाच्या दृष्टीने भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी, स्वबळावर विजय मिळविण्यासाठी आवश्यक मतांपासून 113 मतांनी दूर आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत महायुतीत महाभारत घडले. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेना हे दोन्ही पक्ष भाजपवर प्रचंड नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात सर्वपक्षीय मोट बांधली जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

यापूर्वीची निवडणूक दि. 19 नोव्हेंबर 2016 रोजी झाली होती. काँग्रेस नेते मोहनराव कदम यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे यांचा पराभव करत आमदारकी मिळवली होती. मोहनराव कदम यांच्या या आमदारकीची मुदत दि. 5 डिसेंबर 2022 रोजी संपली. मात्र पात्र मतदारांपैकी 50 टक्क्यांहून अधिक मतदार असतील तरच निवडणूक घेता येते. त्यावेळी सांगली, सातारा जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकराज सुरू होते. त्यामुळे विधानपरिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक होऊ शकली नाही. मुदत संपून आता 3 वर्षे 5 महिने झाले आहेत.

आता विधानपरिषदेवरील या जागेसाठी निवडणूक लागली आहे. ही निवडणूक मतदारांसाठी पर्वणी ठरणार, असे दिसत आहे. सांगलीतून या निवडणुकीसाठी भाजपकडून जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नावांची चर्चा आहे, तर साताऱ्यातून भाजपकडून ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांच्या नावाची चर्चा आहे. विरोधकांकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

साताऱ्यात महायुतीतच महाभारत..!

सातारा जिल्ह्यात भाजपचे स्पष्ट वर्चस्व दिसते. 199 मतांसह हा जिल्हा भाजपचा मुख्य आधार बनला आहे, तर सांगलीत भाजप 115 मतांवर असला तरी, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एकत्रित ताकद लक्षणीय आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक समीकरणे आणि वैयक्तिक संबंधही मतदानावर परिणाम करू शकतात. भाजप हा मतदारसंख्येच्यादृष्टीने सर्वात मोठा पक्ष आहे. महायुतीत शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आहेत.

मात्र सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीतच महाभारत घडले. या पार्श्वभूमीवर भाजपला सहकार्य करण्यास शिवसेना, राष्ट्रवादी कितपत तयार होणार, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. भाजपविरोधी सर्व पक्ष एकत्र येणार, की भाजप काही करिष्मा करणार, याकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत स्थानिक राजकारण, वैयक्तिक प्रभाव, आघाड्या आणि राजकीय रणनीती यांची खरी परीक्षा आहे. भाजपकडे सर्वाधिक मते असली तरी, विजयाची किल्ली राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या हाती आहे. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT