सांगली : बिसूर येथे घरात पाळलेल्या कुत्र्याने 11 वर्षांच्या मुलावर हल्ला करून चावा घेतला. याबाबत जाब विचारल्यानंतर मुलाच्या वडिलांना शिवीगाळही केली. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर कुत्र्याचा मालक दिनकर पांडुरंग देशमुख (रा. बिसूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बिसूर येथील संघर्ष रमेश कांबळे (वय 11) हा बुधवारी सकाळी घरासमोर रस्त्यावर व्यायाम करण्यासाठी गेला होता. सकाळी साडेसातच्या सुमारास शेजारील दिनकर देशमुख यांनी पाळलेल्या गावठी कुत्र्याने संघर्ष याच्यावर हल्ला केला. संघर्ष खाली पडल्यानंतर त्याला चावा घेताना संघर्षने आरडाओरड केला. तेव्हा त्याचे वडील व इतर मदतीला धावले. तोपर्यंत कुत्र्याने संघर्षच्या मांडीला व कमरेला जोरदार चावा घेतला होता. कुत्र्याच्या तावडीतून सुटका केल्यानंतर वडील रमेश यांनी देशमुख यांना कुत्रे बांधून ठेवा, असे सांगितले. तेव्हा देशमुखाने काठी घेऊन शिवीगाळ करत कांबळे यांच्या अंगावर धाव घेतली. तेव्हा इतरांनी त्यांना आवरले. संघर्ष याच्यावर उपचार केल्यानंतर वडील रमेश यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.