तासगाव : तासगाव तालुक्यातील बिरणवाडी (मोरे मळा, सावळज रोड) येथील बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी घरातील सुमारे २३० किलो वजनाचे लोखंडी लॉकर आणि भिंतीवरील घड्याळ असा ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी विजय दिलीप मोरे (वय ४२, रा. बिरणवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय मोरे यांचे चुलते मधुकर काशिनाथ मोरे हे बंगळुरू येथे सोने-चांदी गलाईचा व्यवसाय करतात. त्यांनी गेल्या महिन्यातच बिरणवाडी येथील आपल्या घरासाठी २३० किलो वजनाचे नवीन लोखंडी लॉकर खरेदी केले होते. २८ सप्टेंबर रोजी ते घराला कुलूप लावून पुन्हा बंगळुरूला गेले होते.
दरम्यान, २ ऑक्टोबरच्या सकाळी मधुकर मोरे यांनी बंगळुरूहून फोन करून घरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याचे सांगत पुतण्याला घरी जाऊन पाहण्यास सांगितले. फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी जाऊन पाहिले असता, चोरट्यांनी हॉलच्या खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले. चोरट्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली होती. बेडरूममध्ये ठेवलेले ५० हजार रुपये किमतीचे २३० किलो वजनाचे बंद लॉकर आणि १ हजार रुपयांचे भिंतीवरील घड्याळ चोरट्यांनी लंपास केले होते. या घटनेचा अधिक तपास तासगाव पोलिस करत आहेत.
बंद लॉकरमधील ऐवज आज समजणार
चोरट्यांनी लांबवलेल्या २३० किलो वजनाच्या बंद लॉकरमध्ये नक्की कोणकोणते मौल्यवान दागिने व ऐवज होता, याबाबत घरमालक मधुकर मोरे हे स्वतः शनिवार, दि. ३ ऑक्टोबररोजी बिरणवाडी येथे आल्यानंतरच स्पष्टता होणार आहे. घरमालक आल्यानंतर लॉकरमधील चोरीला गेलेल्या एकूण मुद्देमालाची खरी किंमत समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.