कोकरूड : बिळाशी (ता. शिराळा) येथे फरशीच्या ओढ्यावर गुरुवार, दि. 4 रोजी रात्री 10 वाजता चालकाचा ताबा सुटून रस्त्याकडेच्या कठड्याला ट्रॅक्टर धडकला. अपघातात ट्रॅक्टरचालक श्रेयस राजाराम पाटील (वय 22, रा. रेड, ता. शिराळा) याचा मृत्यू झाला. याबाबत अनिकेत नामदेव पाटील यांनी कोकरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुरुवारी रात्री श्रेयस ट्रॅक्टर (एमएच 10 - 6375) घेऊन येत होता. बिळाशी-मांगरूळदरम्यान एका वस्तीजवळील वळणावर त्याचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याकडेच्या सिमेंटच्या कठड्याला धडकला. अपघातात वर्मी मार लागल्याने श्रेयसचा मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास सहायक निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे सांगण्यात आले.