जत : बसर्गी (ता. जत) येथील जिताणी वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेची पत्र्याच्या शेडमध्ये भरत असल्याबाबत दयनीय अवस्थेचे चित्रण सर्वप्रथम ‘दैनिक पुढारी’ने केले होते. जागा खरेदीच्या तांत्रिक अडचणीमुळे शासनाला वर्गखोल्या उभारता येत नव्हत्या.
जनजागृतीमुळे लोकसहभागातून शाळा उभारणीचा श्रीगणेशा झाला. सडलेल्या पत्रा-शेडमध्ये चार वर्ग भरत असल्याचे वास्तव समोर येताच ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी आणि सामाजिक संस्था एकत्र आल्या. या चळवळीला संघटित आणि पारदर्शक स्वरूप देण्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने स्वतंत्र बँक खाते सुरू केले. शालेय व्यवस्थापन समितीने शाळा सुधार समिती सुरुवात केली. शाळेला जागाही नव्हती, मात्र तुळशीराम बामणे यांनी 5 गुंठे जागा विनामूल्य देत या उपक्रमाचा पाया रचला. त्यानंतर रोख रक्कम, तसेच खडी, वाळू, एम-सँड, दरवाजे-खिडक्या अशा साहित्य स्वरूपात मदत मिळाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केल्याने गावाबाहेरील नागरिकांचाही सहभाग वाढला. ‘पुढारी’च्या पाठपुराव्यामुळे सुरू झालेली ही चळवळ आता ग्रामीण भागातील लोकसहभागाचे आदर्श उदाहरण ठरत आहे.