बारगीर टोळीकडून एकावर जीवघेणा हल्ला File Photo
सांगली

Sangli crime : बारगीर टोळीकडून एकावर जीवघेणा हल्ला

मिरजेत टोळीयुद्धाचा भडका : दोन्ही गटाकडून फिर्याद देण्यास टाळाटाळ

पुढारी वृत्तसेवा

मिरज : मिरजेत शुक्रवारी दुपारी सराईत गुन्हेगार इशरत बारगीर याच्यावर कोयत्याने हल्ला करून त्याची धिंड काढण्यात आली. या रागातून बारगीर टोळीतील काही जणांनी धिंड काढण्यामध्ये सहभागी असणाऱ्या एका अल्पवयीन तरुणावर जिवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोन्ही टोळ्यांकडून पोलिसात फिर्याद देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

इशरत बारगीर हा सराईत गुन्हेगार असून त्याची गेल्या काही दिवसांपासून मिरजेत दहशत वाढली होती. शहरातील अवैध व्यवसाय चालकांना तो फोन करायचा. कोणत्या पोलिसाला हप्ता देतोस? मला हप्ता दे, अशी तो मागणी करीत होता. तसेच मिरज शहर पोलिस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास हप्ता देत असलेल्या अवैध व्यवसाय चालकाचे कथित फोन रेकॉर्डिंगही त्याने समाजमाध्यमावर व्हायरल केले होते. त्यामुळे त्याचा गेल्या काही दिवसांपासून अवैध व्यवसाय चालकांसोबत वाद सुरू होता. तसेच मिरजेत त्याने अनेकांना धमकीही दिली होती. त्याच्या दहशतीला वैतागलेल्या काही तरुणांनी शुक्रवारी दुपारी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच हात जोडून माफी मागायला लावून शहरातून त्याची धिंड काढली. 15 ते 20 तरुणांच्या टोळक्याने हे कृत्य केले.

या प्रकारानंतर बारगीर टोळीतील तरूण धिंड काढणाऱ्या तरुणांच्या मागावर होते. बारगीर याच्यावरील हल्ल्यत इदगाह माळ येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाचाही सहभाग होता. तो शुक्रवारी रात्री मिरज दुय्यम बाजार समोरील एका दारू दुकानात आल्याची माहिती बारगीर टोळीतील काहीजणांना मिळाली होती. त्याच्या मागावर असणाऱ्या तरुणांनी त्याला गाठून हल्ला केला. दारूची बाटली त्याच्या डोक्यात फोडली. तसेच फुटलेल्या बाटलीने त्याच्या हातावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले. परंतु त्याच्यावर नेमका कोणत्या हत्याराने हल्ला केला, हे समजू शकले नाही. दरम्यान, मिरज शहर आणि महात्मा गांधी चौक पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत. परंतु दोन्ही टोळीतील जखमींकडून शनिवारी सायंकाळपर्यंत पोलिसांना तक्रार दाखल नसल्याचे सांगण्यात आले.

टोळी मोडीत काढण्याची गरज

इशरत बारगीर हा पोलिस कारवाई टाळण्यासाठी कोणतेही कृत्य स्वत:हून करीत नव्हता. तसेच कोणत्याही कारवाईमध्ये स्वत: सहभागी होत नव्हता. त्यामुळे त्याच्यावर मोठी कारवाई करण्यासाठी पोलिसांना अडचणी येत होत्या. परंतु आता दोन टोळ्यांमध्ये धुमश्चक्री झाल्याने बारगीर टोळी पुन्हा पोलिसांच्या रडारवर आली आहे. त्यामुळे त्याची दहशत मोडीत काढण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT