बनपुरीत अपघातात बालक जखमी; जाब विचारल्याने पालकास मारहाण 
सांगली

Sangli Accident : बनपुरीत अपघातात बालक जखमी; जाब विचारल्याने पालकास मारहाण

आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : बनपुरी (ता. आटपाडी) येथील यमगरवस्ती परिसरात भरधाव दुचाकीने दहा वर्षांच्या मुलाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी (दि. २०) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात आदर्श दिलीप यमगर हा मुलगा जखमी झाला. या घटनेबाबत जाब विचारल्याच्या रागातून दुचाकीस्वाराने फिर्यादीला शिवीगाळ करून ढकलून दिल्याची घटना घडली असून याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दादा नाना यमगर (वय ५०, रा. बनपुरी, ता. आटपाडी) यांनी फिर्याद दिली असून अमोल सुखदेव चौगुले (रा. बनपुरी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी अमोल चौगुले हा आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच १० सीझेड ८३३४) यमगरवस्ती येथील रस्त्यावरून जात होता. रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने हयगयीने व बेदरकारपणे वाहन चालवत आदर्श यमगर याला पाठीमागून धडक दिली. यामध्ये तो जखमी झाला.

घटना घडल्यानंतर फिर्यादी दादा यमगर यांनी, ‘लहान मुले रस्त्यावर असतात, पाहून वाहन चालवत जा,’ असे बजावले. याचा राग आल्याने संशयिताने फिर्यादीला शिवीगाळ करून ढकलून दिले. या मारहाणीत फिर्यादीच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT