Sangli Bank Fraud | जिल्हा बँकेत 50 लाखांचा अपहार Pudhari File Photo
सांगली

Sangli Bank Fraud | जिल्हा बँकेत 50 लाखांचा अपहार

बाज शाखेतील प्रकार : चौकशी सुरू; शासनाचे अनुदान शाखाधिकार्‍यांनी हडपले

पुढारी वृत्तसेवा

सांगली : शासनाकडून शेतकर्‍यांना देण्यासाठी आलेल्या अनुदानाची रक्कम हडप करण्याचा आणखी एक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाज (ता. जत) शाखेत शाखाधिकारी संदीप सोलनकर आणि लिपिक कोंडीबा खरात संशयित आहेत. त्यांनी शासकीय निधीतील सुमारे पन्नास लाखांचा अपहार केल्याचा आरोप आहे. पन्नास लाख हा आकडा प्राथमिक अंदाज आहे, तो वाढूही शकतो, अशी माहिती मिळाली.

बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शाखेतील कर्मचारी, अधिकारी यांची चौकशीही सुरू केली आहे. शासनाकडून वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुदान शेतकर्‍यांसाठी येत असते. जे शेतकरी अनुदान घेण्यासाठी येत नाहीत, त्यांची रक्कम हडप करण्याचे प्रकार जिल्हा बँकेच्या काही शाखांत घडले होते. हा प्रकार उघडकीस आल्यावर संबंधितांवर कठोर कारवाई करून त्यांच्याकडून संबंधित रक्कमही वसूल केली आहे. बाज येथेही असाच प्रकारउघडकीस आला आहे.

शासनाकडून शेतकर्‍यांसाठी आलेल्या अनुदानातील सुमारे पन्नास लाख रुपये तत्कालीन शाखाधिकार्‍यांनी बँकेच्या खात्यावरून स्वतःच्या आणि इतर नातेवाईकांच्या नावे टाकून अपहार केल्याचा प्रकार बँकेच्या तपासणीमध्ये आढळून आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेच्या मुख्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांचे पथक जत तालुक्यात गेले आहे. ते तेथे तळ ठोकून आहे. त्यांनी बाज शाखेची दिवसभर तपासणी केली.

जिल्हा बँकेच्या वर्षभरातील व्यवहाराची चौकशी बँकेकडून वारंवार केली जाते. बँकेचे त्रयस्थ यंत्रणेकडून लेखापरीक्षण होते. याशिवाय बँकेच्या अधिकार्‍यांकडूनही अंतर्गत तपासणी होते. याचबरोबर बाहेरील जिल्ह्यांतील शासकीय अधिकार्‍यांकडूनही चौकशी होते. तरीही अपहार झालेला आहे.

अपहार प्रकरणातील शाखाधिकारी संदीप सोलनकर यांचे वडील बँकेचे कर्मचारी होते. त्यानंतर ते शिपाई म्हणून बँकेत नोकरीला लागले. शिपाईचे शाखाधिकारी झाले. मात्र त्यांचा कारभार सतत वादग्रस्त राहिला. यापूर्वीही दोनवेळा ते वादग्रस्त ठरले आहेत. दोन वर्षांपूर्वी वरिष्ठ कार्यालयाचा आदेश असतानाही आदेश डावलून त्यांनी कामावर असताना (ऑनड्युटी) गोवा दौरा केला होता. याप्रकरणी बँकेने त्यांच्यावर कारवाई केली होती. त्या शाखाधिकार्‍यांकडून अपहार निदर्शनास आल्याने चौकशी सुरू केली आहे.

आठ वर्षे का लागली?

शाखेत 2017 मध्ये हा अपहार केला आहे आणि तब्बल आठ वर्षांनंतर हा प्रकार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाज शाखेत अपहार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा वरिष्ठ अधिकार्‍यांतर्फे तपास सुरू आहे. चौकशीअंती अपहाराची रक्कम निश्चित होईल. त्यानंतर दोषींवर तत्काळ कारवाई केली जाईल.
- शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT