arrest File Photo
सांगली

Sangli Bank Fraud Case : बँक फसवणूक प्रकरणातील फरारी संशयितास अटक

तीन कोटीचा गंडा; दहा वर्षे पोलिसांना गुंगारा; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : बँक ऑफ महाराष्ट्रच्या ईश्वरपूर शाखेची खोटी कागदपत्रे व बनावट सात/बारा उतारे सादर करून ३ कोटी २ लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या ९ वर्षे १० महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या सांगलीच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने आवळल्या. राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ५२, रा. हाळभाग, वाळवा, ता. वाळवा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, सन २०१४ ते २०१६ या कालावधीत संशयित राजेंद्र शिंदे आणि त्याच्या अन्य साथीदारांनी संगनमत करून बँक ऑफ महाराष्ट्रच्या ईश्वरपूर शाखेत प्रत्यक्षात कमी जमीन असताना जास्त असल्याचे भासवणारे बनावट सात/बारा उतारे व खोटे शासकीय शिक्के तयार केले होते. तसेच, काहींच्या नावावर कोणतीही जमीन नसताना खोटी कागदपत्रे बँकेत तारण म्हणून सादर करून तब्बल ३ कोटी २ लाख १४ हजार ८१८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली होती. याप्रकरणी बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक शीतलनाथ वसंतराव बागी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित राजेंद्र शिंदे हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता.

फरार राजेंद्र शिंदे हा रात्री-अपरात्री हाळभाग, वाळवा येथील आपल्या घरी येत असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलिस उपनिरीक्षक रमेश कोळी व हवालदार संदीप मोरे यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिस उपअधीक्षक स्वाती गायकवाड व सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या पथकाने वाळवा येथे सापळा रचला. राजेंद्र शिंदे हा वाळवा येथे घरी आल्याची खात्री पटताच पथकाने त्याला पळून जाण्याची संधी न देता मंगळवारी घरातूनच ताब्यात घेतले. विचारपूस केल्यानंतर त्याने आपली ओळख पटवून दिली. याप्ररणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT