सांगली

Sangli News: बंद, मोर्चा, केंद्र सरकारचा धिक्कार

सांगलीसह जिल्ह्यातून तीव्र निषेध, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सांगली: नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, विद्यार्थी आंदोलकांवरील कारवाईची निष्पक्ष चौकशी करावी, विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या दिल्ली पोलिसांवर कारवाई करावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी आदी मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यात गुरुवारी बंद पाळण्यात आला. वंचित बहुजन आघाडीने बंदचे आवाहन केले होते.

शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन झाले. अनेक ठिकाणी निवेदने देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाचा वणवा पेटल्याचे पडसाद सांगली शहरासह जिल्ह्यात उमटले. व्यापारी संघटनेच्या आवाहनानुसार दुकाने बंद ठेवून विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.

भाजपात गेलेल्या मंडळींनी पक्षश्रेष्ठींना जाब विचारावा : पाटील

दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेला लाठीमार हा लोकशाहीला काळिमा फासणारा आहे, अशी टीका माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली. काँग्रेससह विविध पक्षांतून भाजप किंवा सत्ताधारी पक्षात गेलेल्या नेत्यांनी या घटनेबाबत पक्षश्रेष्ठींना जाब विचारावा, असे आवाहनही त्यांनी केले.

ते म्हणाले, विद्यार्थ्यांवर काठ्यांनी हल्ला करणाऱ्या व्यक्ती पोलिस होते की गुंड, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांनीही मारहाण करणाऱ्यांची ओळख संशयास्पद असल्याचा दावा केला आहे. या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. विकास कामांसाठी पक्षांतर केल्याचे सांगणाऱ्या नेत्यांनी निधी मिळवणे वेगळे आणि अशा घटनांवर मौन बाळगणे वेगळे आहे. जनतेसमोर मत मागण्यासाठी गेल्यानंतर लोक या भूमिकेचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही पाटील यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT