मिरज : सराईत गुंड व सांगलीतील गाजलेला वेदांत बंडगर खून प्रकरणातील मोक्कातून जामिनावर बाहेर आलेला अतुल पोपट ऊर्फ दादासाहेब वायदंडे (वय २८, रा. खंडेराजुरी, ता. मिरज) याची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये झालेल्या जुन्या खुनामध्ये झालेला जामीन न्यायालयाने रद्द केला आहे. अतुल वायदंडे हा सराईत गुन्हेगार असून वेदांत बंडगर खून प्रकरणात तो नीलेश गडदे याचा साथीदार होता.
अतुल वायदंडे याने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाचा खून केला होता. यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. परंतु या खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला न्यायालयाने अटीशर्ती घालून जामीन मंजूर केला होता. न्यायालयाने घालून दिलेल्या अटी शर्तीवर तो जामिनावर बाहेर असतानाही सांगलीत गाजलेल्या वेदांत बंडगर खुनामध्ये त्याने सहभाग घेतला होता. यामध्ये त्याला मोक्का देखील लागला होता. परंतु तो मोक्कामधून जामिनावर सुटला होता.
मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये झालेल्या खून प्रकरणात जामिनावर बाहेर असताना न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून पुन्हा खून केल्याने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये झालेल्या खून प्रकरणातील त्याचा जामीन रद्द करावा असा प्रस्ताव मिरज पोलिस उपाधीक्षक अजय कोकाटे, मिरज ग्रामीणचे पोलीलिस निरीक्षक अमित पाटील यांनी न्यायालयाला पाठवला होता.
जामिनावर बाहेर असताना खून तसेच इतर गंभीर गुन्हे त्याच्याकडून सुरूच होते. अतुल वायदंडे याच्या वर्तणुकीमध्ये सुधारणा होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये झालेल्या खुनातील त्याचा जामीन रद्द करून त्याची पुन्हा कारागृहात रवानगी केली आहे.