बाईक टॅक्सीवर बंदीसाठी रिक्षा चालकांचा संप 
सांगली

Sangli News| बाईक टॅक्सीवर बंदीसाठी रिक्षा चालकांचा संप

सांगलीत आरटीओ कार्यालयासमोर निदर्शने; विविध मागण्या

पुढारी वृत्तसेवा

सांगली : अनधिकृत बाईक टॅक्सीवर बंदी आणावी आणि कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करावी, यांसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्ह्यात एकदिवसीय बंद पुकारण्यात आला. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयासमोर निदर्शने करत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा कायमस्वरूपी बंद करावी आणि इलेक्ट्रिक रिक्षांना परमिटची सक्ती करावी. कोकण भागातून विक्री होऊन सांगली जिल्ह्यात व्यवसाय करणाऱ्या विनापरवाना बेकायदेशीर रिक्षांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करावी. तसेच, जिल्ह्यात खासगी वाहनांतून सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक त्वरित रोखावी आणि रिक्षा कल्याणकारी मंडळातून चालकांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू करावी, आदी मागण्यांचा यात समावेश आहे. या बंदमध्ये सांगली, मिरज, कुपवाड, विटा, खानापूर, आटपाडी, पलूस, कवठेमहांकाळ, आष्टा, शिराळा, ईश्वरपूर, कासेगाव, जत आणि तासगाव येथील रिक्षाचालक सहभागी झाले होते.

आंदोलनात स्वराज्य रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाटील, अजित पाटील, शौकत शेख, रामचंद्र सोनवणे, अजित नाईक, साजिद अत्तार, सलीम कुरणे, अमित घाडगे, रमेश सावंत, शकील सय्यद, अमोल हांडे, अमोल पुजारी, संतोष हारोळे, प्रमोद होवाळे, हणमंत कांबळे, साहेबपीर पिरजादे आदींसह रिक्षाचालक सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT