आटपाडी : आंबेबनमळा-आटपाडी येथील यशराज हॉटेलमध्ये घुसून हॉटेल चालक महिलेस शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. संशयितांनी हॉटेलमधील रोख रक्कम लंपास करून फिर्यादी महिलेची मुलगी, मुलगा व भावालाही मारहाण केली. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे.
चांदणी गणेश देशमुख (वय 40, रा. आंबेबनमळा, ता. आटपाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश बाळू हाके (वय 26, रा. देशमुख गल्ली, आटपाडी) व सनद सुरेश मंडले (वय 28, रा. आटपाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 20 मेरोजी रात्री संशयित दोघे यशराज हॉटेलच्या किचनमध्ये गेले. ‘आम्हाला लगेच जेवण द्या, नाहीतर सोडणार नाही,’ अशी दमदाटी करत त्यांनी शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर संशयित दोघे हॉटेलच्या काउंटरधून पाचशे रुपयांच्या दोन नोटा व शंभर रुपयांची एक नोट घेत असताना फिर्यादी, तिचा मुलगा, मुलगी व भाऊ यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी संशयितांनी सर्वांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. लाकडी दांडके घेऊन फिर्यादीची मुलगी मोनिका आणि प्रशांत शिंदे यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या झटापटीदरम्यान फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र हरवले असून, सोडविण्यास आलेल्या तिच्या आई-वडिलांनाही संशयितानी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. संशयितांनी हॉटेलच्या काउंटरमधून एकूण अकराशे रुपये घेऊन पळ काढल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.