बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आटपाडीच्या आठवडा बाजारात पाच कोटींची उलाढाल 
सांगली

Sangli News : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आटपाडीच्या आठवडा बाजारात पाच कोटींची उलाढाल

१० हजारहून अधिक बकऱ्यांची आवक

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आटपाडी येथील शेळ्या-मेंढ्यांच्या आठवडा बाजारात यंदा विक्रमी उलाढाल झाली असून तब्बल पाच कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बकरी ईदमुळे बाजारात लहान-मोठ्या मिळून १० हजारहून अधिक बकऱ्यांची आवक झाली होती. राज्यातील विविध भागांतून व्यापारी आणि ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याने बाजार परिसर दिवसभर गजबजून गेला होता.

विशेषतः कुर्बानीसाठी आकर्षक, वजनदार आणि देखण्या बकऱ्यांना मोठी मागणी होती. काही मोठ्या बकऱ्यांना एक लाख रुपयांहून अधिक किंमत मिळाल्याची चर्चा बाजारात रंगली होती. तर सरासरी चांगल्या प्रतीच्या बकऱ्यांना ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. त्यामुळे पशुपालक आणि व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यासह कोकणातून अनेक व्यापारी आणि ग्राहक आटपाडीत दाखल झाले होते. सकाळपासूनच बाजारात वाहनांची मोठी वर्दळ होती. बाजार समिती आवारात खरेदी-विक्रीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याने व्यवहार सुरळीत पार पडले. अनेक ग्राहकांनी पसंतीचा बकरा मिळवण्यासाठी मोठ्या किंमती मोजल्या.

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून बाजारात पिण्याचे पाणी, सावली, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच बाजारातील पारदर्शक कारभार आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे व्यापाऱ्यांचा विश्वास वाढला असून यंदा आवकेतही मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बकरी ईदच्या निमित्ताने झालेल्या या मोठ्या उलाढालीमुळे आटपाडीचा आठवडा बाजार पुन्हा एकदा जिल्ह्यातील महत्त्वाचा पशुधन बाजार म्हणून चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT