आटपाडीत अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी रास्ता रोको  
सांगली

Sangli News : आटपाडीत अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी रास्ता रोको

धनगर समाज आक्रमक : रस्ता रोकोमुळे आटपाडी-दिघंची मार्गावरील वाहतूक विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : आटपाडी शहरातील भवानी विद्यालयाच्या मैदानावर शासकीय जागेत उभारण्यात आलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा त्याच ठिकाणी कायमस्वरूपी ठेवावा, या प्रमुख मागणीसह धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी आक्रमक वळण मिळाले. उपोषणाच्या पाचव्या दिवशी सकल धनगर समाजाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर आटपाडी-दिघंची रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ज्येष्ठ नेते जयप्रकाश हुलवान व शुभम हाके यांनी १५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, यासाठी आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात आली. पुतळा कायमस्वरूपी ठेवण्याबरोबरच इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत मेंढपाळांसाठी असलेल्या अनुदानाच्या योजनांचा सरसकट लाभ द्यावा, महामेष व स्वयं योजनेचा लाभ मिळावा, निवासी शाळा सुरू कराव्यात, चराई अनुदान द्यावे, तसेच डबई कुरण संवर्धित राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय रद्द करावा, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.

दरम्यान, आंदोलनस्थळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, नगराध्यक्ष उत्तम जाधव, ज्येष्ठ नेते श्रावण वाक्षे, अंकुश मुढे उपस्थित झाले. यावेळी आंदोलकांशी चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष उत्तम जाधव यांनी महावितरण कार्यालयासमोरील नगरपंचायतीच्या जागेत अहिल्यादेवींचा पुतळा व बगीचा उभारण्याचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले. मात्र, या जागेच्या जवळच बिअर बार असल्याने आंदोलकांनी हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावला. भवानी विद्यालयाच्या मैदानावरच पुतळा कायम ठेवावा, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली.

अमरसिंह देशमुख यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, भवानी हायस्कूलच्या मैदानावर उभारलेला पुतळा शिक्षण संस्थेच्या जागेत आहे की शासकीय जागेत, हे प्रथम निश्चित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जागा संस्थेची असल्यास पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करू, तर जागा शासकीय असल्यास सर्वांनी एकत्रितपणे शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर तहसील कार्यालयात प्रांताधिकारी विक्रम बांदल यांच्या उपस्थितीत पुतळ्याच्या जागेबाबत बैठक झाली. सध्या उभारलेला पुतळा नेमका कोणत्या हद्दीत येतो, याची वस्तुनिष्ठ माहिती मिळविण्यासाठी शासकीय जागेची मोजणी करण्याचे निर्देश भूमी अभिलेख कार्यालयाला देण्यात आले. शिक्षण संस्थेनेही त्यांच्या जागेची मोजणी करून घ्यावी, अशी सूचना करण्यात आली.

मोजणीनंतर पुतळा कोणाच्या मालकीच्या जागेत आहे, हे स्पष्ट होईल. त्यानंतर संबंधित शासकीय यंत्रणा किंवा शिक्षण संस्थेकडे कायदेशीर परवानगी घेऊन पुतळा उभारणीबाबत पुढील कार्यवाही करावी, असे प्रांताधिकारी बांदल यांनी स्पष्ट केले. यावेळी पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता अथवा वाट उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावरून काहीकाळ वादावादीही झाली. बैठकीनंतर प्रांताधिकारी बांदल यांनी आंदोलनस्थळी येऊन प्रशासनाच्या भूमिकेबाबत आंदोलकांना माहिती दिली. शासकीय जागेची मोजणी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, शिक्षण संस्थेलाही त्यांच्या जागेची मोजणी करण्यास सांगण्यात आले आहे. जागेची वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यानंतर पुतळ्याबाबत कायदेशीर मार्गाने निर्णय घेता येईल, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT