आटपाडी बाजार समितीच्या दिघंची पेट्रोल पंपावर 9.22 लाखांची फसवणूक file photo
सांगली

Sangli News : आटपाडी बाजार समितीच्या दिघंची पेट्रोल पंपावर 9.22 लाखांची फसवणूक

मीटर रीडिंगमध्ये फेरफार; तिघांविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी ः आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिघंची (ता. आटपाडी) येथील पेट्रोल पंपावर मीटर रीडिंगमध्ये फेरफार करून प्रत्यक्ष जमा झालेली रक्कम कमी दाखवून तब्बल 9 लाख 22 हजार 16 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

याबाबत बाजार समितीचे शशिकांत उत्तम जाधव (वय 50, रा. शिवाजीनगर, आटपाडी ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार धीरज शिवाजी रणदिवे (वय 30), सूरज कैलास रणदिवे (वय 25) आणि दादा मोहन रणदिवे (वय 30, सर्व रा. दिघंची) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार 1 ऑगस्ट 2024 ते दि. 31 मार्च 2025 या कालावधीत हा प्रकार घडला. संबंधित संशयित पेट्रोल पंपावर कामास होते. त्यांनी पंपावरील इंधन विक्रीचे मीटर रीडिंग कमी दाखवले. या व्यवहाराची संपूर्ण रक्कम खात्यात जमा न करता अपहार केला. सुमारे 9 लाख 22 हजार 16 रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे. याबाबत 19 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. बाजार समितीच्या मालकीच्या संस्थेतच असा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित रक्कम मोठी असल्याने आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे. पंपावरील विक्री नोंदी, बँक व्यवहार आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून पुढील तपास आटपाडी पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT