शिवानंद क्षीरसागर
दिघंची : आटपाडी तालुक्यातील ५३ गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे ११५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली धनगाव पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात रखडल्याचे समोर आले आहे. पाइपलाइन टाकूनही योजनेचा अपेक्षित लाभ गावांना मिळाला नाही. आता मुख्य दाब पाइपलाइन बदलण्यासाठी आणखी ४० ते ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.
या योजनेबाबत दिघंची येथील ॲड. विलास पंडितराव देशमुख यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. न्या. मिलिंद एन. जाधव व न्या. नंदेश एस. देशपांडे यांच्या खंडपीठाने ३ ऑगस्ट २०२६ रोजी याचिका निकाली काढली. मात्र, भविष्यात पिण्याच्या पाण्याबाबत अडचण निर्माण झाल्यास याचिकाकर्त्याला पुन्हा न्यायालयात दाद मागण्याची मुभा न्यायालयाने कायम ठेवली आहे.
११५ कोटी खर्च; योजना मात्र अपूर्ण
न्यायालयीन आदेशातील नोंदीनुसार, ५३ गावांसाठी पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी सुरुवातीला सुमारे १०३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर अतिरिक्त कामासाठी आणखी सुमारे १२ कोटी रुपये मंजूर झाले. त्यामुळे योजनेवर एकूण सुमारे ११५ कोटी रुपये खर्च झाल्याचे न्यायालयासमोर नमूद करण्यात आले.
२०१९ मध्ये चाचणी घेण्यात आली. मात्र, काही ठिकाणी पाइपलाइन फुटल्याने योजनेच्या कार्यान्वयनात अडथळे निर्माण झाले. परिणामी योजना अपेक्षित क्षमतेने सुरू होऊ शकली नाही.२५ किलोमीटरची मुख्य पाइपलाइन बदलावी लागणार. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, धनगाव ते डोर्लीदरम्यानची सुमारे २५ किलोमीटर लांबीची मुख्य दाब पाइपलाइन बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी अंदाजे ४० ते ५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, आटपाडी तालुक्यातील बहुतांश गावांना जलजीवन मिशनअंतर्गत स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना उपलब्ध झाल्याने जुन्या धनगाव योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी एवढा मोठा निधी खर्च करणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने न्यायालयाला सांगितले.
पाइपलाइनची दुरवस्था; पंप, व्हॉल्व्ह चोरीला
न्यायालयीन आदेशात नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मूळ योजनेची पाइपलाइन खराब अवस्थेत आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान मुख्य दाब पाइपलाइनचे नुकसान झाले आहे. योजना दीर्घकाळ निष्क्रिय राहिल्याने त्यावरील पंप व व्हॉल्व्ह चोरीला गेल्याचेही नमूद करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांत तक्रार अथवा एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. ५३ गावांच्या योजनेऐवजी ५६ स्वतंत्र योजनासध्या आटपाडी तालुक्यात ५६ स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यरत असल्याचे अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले. यापैकी ५४ योजना जिल्हा परिषदेमार्फत, तर दोन योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत चालवल्या जात आहेत. ११५ कोटींच्या खर्चानंतर पुन्हा ४० ते ५० कोटींची गरज एका बाजूला ११५ कोटी रुपये खर्च करून पाइपलाइन उभारण्यात आली, तर दुसऱ्या बाजूला योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकली नाही. आता मुख्य पाइपलाइन बदलण्यासाठी पुन्हा ४० ते ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने या योजनेच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.