आटपाडीत गदिमा नाट्यगृहासमोरील गाळ्यांवरून संघर्ष 
सांगली

Sangli News : आटपाडीत गदिमा नाट्यगृहासमोरील गाळ्यांवरून संघर्ष

पुनर्वसनाच्या नावाखाली जागेचा प्रश्न; ‘दुकाने की पार्किंग?’ यावरून भाजप-शिवसेना आमने-सामने

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : आटपाडीतील शुक ओढ्याच्या पात्रात नगरपंचायतीमार्फत उभारण्यात येणाऱ्या दुकान गाळ्यांवरून वातावरण चांगलेच तापले. खोकीधारकांचे पुनर्वसन की नाट्यगृहासाठी पार्किंग, या दोन भूमिकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने-सामने आल्याने वादावादी झाली.

नगरपंचायतीमार्फत खोकीधारकांच्या पुनर्वसनासाठी संरक्षक भिंती लगत ४० ते ४५ दुकान गाळे उभारण्यात आले आहेत. त्यानंतर गदिमा नाट्यगृहाच्या समोरही गाळे उभारण्यासाठी पाया काढण्यात आला. याच जागेवर नाट्यगृहात येणाऱ्या प्रेक्षकांसाठी पार्किंगची व्यवस्था करता येऊ शकते, असा मुद्दा जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी उपस्थित केला.

नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारासमोर दुकाने उभी राहिल्यास ये-जा, पार्किंग आणि परिसराच्या सौंदर्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगत त्यांनी या बांधकामाला विरोध केला. वेळ पडल्यास बांधकाम पाडण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादीचे अनिल पाटील, शिवसेना गटनेते अमरसिंह पाटील यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

दरम्यान, नगराध्यक्ष उत्तम जाधव आणि काही नगरसेवकांनी बांधकामाची बाजू मांडली. 'कष्टकऱ्यांचे पुनर्वसनही गरजेचे आहे,' अशी भूमिका घेत खोकीधारकांचे संसार उघड्यावर पडू नयेत, यासाठी गाळे उभारले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वादाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार शीतल बंडगर आणि मुख्याधिकारी वैभव हजारे यांनी परिस्थितीची माहिती घेतली.

एकीकडे कष्टकऱ्यांचे पुनर्वसन हा संवेदनशील प्रश्न, तर दुसरीकडे सार्वजनिक नाट्यगृहासमोरील मोकळी जागा आणि पार्किंगची गरज हे दोन्हीही टाळता न येणारे मुद्दे आहेत. त्यामुळे ‘गाळे उभे राहणार की पार्किंग?’ या प्रश्नापेक्षा ‘दोन्ही गरजा कशा पूर्ण करता येतील?’ यावर तोडगा काढणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. राजकीय श्रेयापेक्षा शहराच्या भवितव्याला प्राधान्य देत समन्वयातून मार्ग काढण्याची गरज या वादातून अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT