आटपाडी : करगणी (ता. आटपाडी) येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर तिच्या आत्महत्येच्या घटनेने तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष प्रकाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी आटपाडी शहरात बंदची हाक देण्यात आली होती. बंदच्या आवाहनाला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शुक्रवारी शहरातील मुख्य बाजारपेठांसह सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने, दुकाने, हॉटेल्स दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवहार ठप्प होते. नेहमी गजबजलेल्या सिद्धनाथ चित्रमंदिर चौक, अण्णा भाऊ साठे चौक, आबानगर, साई मंदिर परिसर, बाजार पटांगण या भागात शुकशुकाट होता. दरम्यान, दुपारी आटपाडी तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात, करगणी प्रकरणातील चारही संशयितांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच, या प्रकरणाशी संबंधित व्हायरल झालेल्या फोन रेकॉर्डिंगमध्ये धनाजी माने नामक व्यक्ती, संशयित महेश व संभा यांना पैसे देऊन आपले व आरोपींचे नाव प्रकरणातून वगळण्यास सांगत असल्याचे उघड झाले आहे. याबाबतही चौकशी करावी. या प्रकरणात संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या निवेदनावर तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले, विष्णू अर्जुन, विनायक पाटील, चंद्रकांत दौंडे, चंद्रकांत काळे, उमाजी सरगर, सोमनाथ सरगर यांच्यासह अनेक पदाधिकार्यांच्या सह्या आहेत.