आटपाडीच्या सौंदर्यात ‘अहिल्या गार्डन’ची भर  
सांगली

Sangli News : आटपाडीच्या सौंदर्यात ‘अहिल्या गार्डन’ची भर

सव्वातीन कोटींचा प्रकल्प; अश्वारूढ पुतळा ठरणार मुख्य आकर्षण : नगराध्यक्ष जाधव

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती आणि लोककल्याणकारी कार्याला अभिवादन करणारे भव्य ‘अहिल्या गार्डन’ उभारण्यात येणार आहे. वीज मंडळासमोरील जागेत साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी तब्बल ३ कोटी ३० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष उत्तम जाधव यांनी दिली.

या प्रस्तावित उद्यानाचे प्रमुख आकर्षण म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य अश्वारूढ पुतळा. त्यांच्या न्यायप्रिय, लोकाभिमुख आणि आदर्श राज्यकारभाराची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश आहे. अहिल्यादेवींनी देशभरातील मंदिरांचा जीर्णोद्धार, तीर्थक्षेत्रांचा विकास तसेच विविध लोककल्याणकारी कामे केली. त्यांच्या कार्याची प्रेरणा देणारे केंद्र म्हणून हे उद्यान विकसित केले जाणार आहे.

अहिल्यादेवींचा पुतळा केवळ स्मारक न राहता न्याय, सेवा, धर्मनिष्ठा आणि लोककल्याणाच्या मूल्यांची प्रेरणा देणारे केंद्र ठरेल, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली. उद्यानामुळे शहराला नागरिकांसाठी आकर्षक सार्वजनिक जागाही उपलब्ध होणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीच्या माध्यमातून विकास कामांना गती देण्यात येत असल्याचे जाधव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT