सांगली : जिल्ह्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह बंडखोरांनी प्रचाराला वेग दिला आहे. मतदारसंघाच्या विकासाचे आश्वासन देत दिवसभरात मतदारांच्या गाठीभेटी, वैयक्तिक बैठका, रॅलीवर उमेदवारांनी भर दिला. मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसून आले.
सांगलीत भाजपचे सुधीर गाडगीळ यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर मारुती चौकापर्यंत रॅली काढून जाहीर सभा घेतली. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील, बंडखोर जयश्रीताई पाटील यांनी गाठीभेटीवर भर दिला. मिरजेत भाजपचे सुरेश खाडे यांनी कुपवाड शहरात पदयात्रा काढली. तर शिवसेना ठाकरे गटाचे तानाजी सातपुते यांनीही मतदारसंघात बैठका घेतल्या. तासगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे रोहित पाटील यांनी बेंद्री, मतकुणकी, शिरगाव, जुळेवाडी येथे प्रचार केला. भाजपचे संजय पाटील यांनी तासगाव तालुक्यात मतदारांच्या भेटी घेतल्या. पलूस-कडेगाव मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. विश्वजित कदम धनगाव, बांबवडे, बुरूंगवाडी येथे तर भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांनी आंधळी, मोराळे, अंकलखोप येथे सभा घेतल्या.
शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कापूसखेड, तांबवे, ऐतवडे बुद्रुक परिसरात सभा घेतल्या. भाजपचे सत्यजित देशमुख यांनी पावलेवाडी, अस्वलेवाडी, रिळे, मांगरुळ, माळेवाडी, चिंचोली, खुजगाव येथे प्रचार दौरा केला. खानापूर-आटपाडी मतदारंसघात राष्ट्रवादीचे वैभव पाटील यांनी विटा शहरातील मतदारांची भेट घेतली. त्यांच्या प्रचारार्थ गुरुवारी जयंत पाटील यांची सभा होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर यांनी खानापूर परिसरात तर बंडखोर राजेंद्र देशमुख यांनी आटपाडी शहरात प्रचार फेरी काढली. इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांनी हाती घेतली आहे. तर जयंत पाटील यांनी शिराळा मतदारसंघातील 48 गावात प्रचाराला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निशिकांत पाटील यांनीही मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे.