राजकीय धुरळा File Photo
सांगली

सांगली : जिल्हाभर राजकीय धुरळा; आरोपांनी गाजला दिवस

Maharashtra Assembly Election : रॅली, सभांनी धूमशान; आता लक्ष अर्ज माघारीकडे

पुढारी वृत्तसेवा

सांगली : आमदारकीच्या रणधुमाळीला मंगळवारी चांगलीच धार आली. अर्ज दाखल करण्याच्या या शेवटच्या दिवशी जिल्हाभर राजकीय धुरळा उठला. अनेक मतदारसंघांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. शेकडोंची रॅली, डोक्यावर पक्षाच्या टोप्या, हातात नेत्यांचे बॅनर, खिशाला बिल्ले आणि तोंडात नेत्यांच्या जयजयकाराच्या घोषणांनी जिल्हा तापला होता. अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत 4 नोव्हेंबरअखेर आहे. या दिवसापर्यंत आता आरोप-प्रत्यारोपांची धग आणखी वाढत जाणार आहे.

जितकी काही राजकीय ताकद आहे, ती सर्वच्या सर्व पणाला लावायचा मंगळवारचा दिवस होता; कारण अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस होता. प्रत्येक मतदारसंघात धुसफुशीचे वातावरण होते. रॅली, नंतर सभा आणि अर्ज भरणे यामुळे वातावरण तापले होते. सभेत आरोपांवर आरोप झाले. एकमेकांची उणीदुणी काढली गेली. सर्व पक्षांचे अधिकृत उमेदवार विरुध्द विरोधक या सूत्रात बंडखोरी करणार्‍या उमेदवारांनीही वातावरण तापवले.

उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली जिल्ह्यात होते. ज्येष्ठ नेते आर. आर. पाटील यांच्या तासगाव आणि आमदार जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यांनी दोन्ही ठिकाणच्या सभांत जोरदार हल्लाबोल केला. तासगाव येथे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामधून आपल्या गटाचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचार सभेत तर त्यांनी धुरळाच उठवला. माझ्यावर 70 हजार कोटींच्या आरोपामध्ये खुली चौकशी करण्याचे आदेश खुद्द आर. आर. पाटील यांनी दिल्याचे त्यांनी जाहीर सभेत सांगून राजकीय बॉम्बस्फोट केला. याचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटणार, यात शंका नाही.

हीच तोफ अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघातही धडाडत ठेवली. काँग्रेसच्या 69 आणि राष्ट्रवादीच्या 71 जागा असूनही मुख्यमंत्रीपद घेता आले नव्हते, मग आता कसे घेणार? असा जाहीर सवाल करून त्यांनी ‘भावी मुख्यमंत्री जयंत पाटील’ या टॅगलाईनवर सणकून टीका केली. जयंत पाटील यांचे थेट नाव न घेता त्यांनी आरोपांवर आरोप केले. करेक्ट कार्यक्रम करता म्हणजे कसला कार्यक्रम करता, असा सवाल करत तोफ डागली. इस्लामपुरात आर.आर. पाटील यांच्या आठवणींनी ते काहीसे थबकले. तंबाखू सोडण्याबाबत सांगूनही न ऐकलेल्या पाटील यांना मुंबई येथील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेव्हा त्यांनी आपला हात हातात घेऊन ‘दादा, तुमचे ऐकायला पाहिजे होते’ असे म्हटल्याची आठवण त्यांनी सांगितली.

दरम्यान, केेंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळही जिल्हा दौर्‍यावर होते. जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरजेत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर किसान चौकातील सभेत मोहोळ यांनी, मिरजेची जनता खाडे यांना पाचव्यांदा मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवेल, असा विश्वास व्यक्त केला.

शिराळ्यात आमदार मानसिंगराव नाईक यांनी जोरदार रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. निनाई साखर कारखान्याचा दालमिया कधी झाला हे समजले नाही, असा टोला लगावत, सभासदांचे 20 कोटी खाणार्‍यांना मतदार थारा देणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव निघालेच. विरोधकांना मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटतो, यापेक्षा त्यांच्याकडून विकासासाठी निधी आणतो, याचेच मोठे दुःख असल्याचे नाईक यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अर्थात सांगली विधानसभा मतदारसंघातही राजकीय हवा गरम राहिली. सांगली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार, काँग्रेस शहर- जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी एकाचवेळी दोन कसरती केल्या. एक म्हणजे पक्षांतर्गत विरोधक जयश्री पाटील यांना भावनिक साद घातली, तर दुसर्‍या बाजूला विरोधक भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. विधानसभेत एकही प्रश्न न विचारणारे सुधीर गाडगीळ कार्यसम्राट कसले? ते तर कार्यशून्य आमदार. पराभूत मानसिकतेने पत्र लिहिणारे सांगलीचा विकास काय करणार? अशी टीका करत त्यांनी सांगलीचे राजकीय वातावरण ढवळून काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT