उत्तम कदम
आष्टा : सांगली जिल्ह्यातील महत्त्वाचे शैक्षणिक आणि व्यापारी केंद्र असलेले आष्टा शहर सध्या गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांच्या विळख्यात अडकले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या कारवाया स्थानिक आष्टा पोलिसांनी करणे अपेक्षित आहे, त्या कारवाया सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाला कराव्या लागत आहेत. यामुळे बाहेरच्यांना दिसणारे अवैध धंदे स्थानिक पोलिसांना का दिसत नाहीत?, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत, तर गेल्या काही दिवसात झालेल्या दोन मोठ्या कारवायांनी आष्टा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आष्टा शहरात छापा टाकून ट्रेमीमाईड या नशेकरिता वापरल्या जाणाऱ्या 74 इंजेक्शन्ससह दोन तरुणांना अटक केली. संशयितांनी ही इंजेक्शन्स ऑनलाईन पोर्टलवरून मागवून चढ्या दराने विकल्याची कबुली दिली. सांगलीच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने बागणी (ता. वाळवा) येथील बसस्थानक परिसरातील 5 पानटपऱ्या सीलबंद केल्या. शाळेसमोरच राजरोसपणे सुरू असलेल्या या दुकानांमधून 17 हजार 926 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली. मात्र आता जरी या पानटपऱ्या सील असल्या तरी, अनेकांनी घरातून मावा, गुटखा विक्री धूमधडाक्यात सुरू ठेवली आहे. याकडे पोलिसांचे लक्ष नाही.
आष्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीत 24 गावांचा समावेश आहे. शहर आणि परिसरात बनावट दारू, मटका, जुगार, व्हिडीओ गेम, अमली पदार्थ, सावकारी आणि खनिजांचे अवैध उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. तरीही स्थानिक पोलिसांकडून होणारी कारवाई शून्य किंवा केवळ दिखावा असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीहून आलेल्या पथकांना अवैध अड्डे दिसतात, मग स्थानिक पोलिसांना हे धंदे कसे दिसत नाहीत?, अशी चर्चा आता चौका-चौकात रंगू लागली आहे. आमच्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत असताना पोलिस मॅनेज आहेत की निष्क्रिय?, असा सवाल पालक व नागरिकांमधून विचारला जात आहे.
आष्टा पालिकेच्या निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांनी गुन्हेगारी आणि व्यसनमुक्ती हा प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पोलिस अधीक्षक व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, परिस्थितीत तसुभरही बदल झालेला नाही. शहरातील वाढत्या गुंडगिरीमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याची दखल घेत नगराध्यक्ष विशाल शिंदे यांनी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन कैफियत मांडली. आम्ही व्यसनमुक्त आष्टा शहरासाठी कटिबद्ध आहोत. पोलिसांनी कठोर पावले उचलली नाहीत, तर आष्टा शहर बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आता तरी अवैध धंदे बंद होणार का?
आष्ट्यातील अवैध धंद्यांना कोणाचे पाठबळ आहे, हा तसा संशोधनाचा विषय ठरत आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या आश्वासनानंतर आता स्थानिक पोलिसांचा वचक पुन्हा निर्माण होतो, की अवैध व्यावसायिकांचे राज्य असेच सुरू राहते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
नशाबंदी मंडळ काय करते?
येथील एका सामाजिक कार्यकर्त्याकडे नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक पद गेल्या अनेक वर्षांपासून आहे. परंतु त्यांच्याकडून जिल्ह्यातच काय, आष्ट्यातही नशाबंदीसाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. सामाजिक कार्यकर्त्यांमधून राजकीय कार्यकर्ता बनलेल्या संबंधित कार्यकर्त्याने याबाबत खुलासा करावा किंवा पदमुक्त व्हावे, अशी मागणी होत आहे.