सांगली

Sangli News: आष्ट्यात मतदानाच्या आकडेवारीत तफावत

स्ट्राँगरूम असलेल्या परिसरात हजारोंचा जमाव, जोरदार घोषणाबाजी

पुढारी वृत्तसेवा

आष्टा : आष्टा नगरपालिकेच्या निवडणुकीतील मतदानानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दिसलेली आकडेवारी यात मोठी तफावत आढळल्याने बुधवारी शहरात एकच खळबळ उडाली. ही आकडेवारी चुकीची असल्याचे स्पष्ट होताच आष्टा शहर विकास आघाडीचे उमेदवार व कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

याचा जाब विचारण्यासाठी मतदान यंत्रे ठेवलेल्या विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल परिसरात हजारो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महसूल व पोलिस प्रशासनाचा निषेध केला. यावेळी जोरदार वादावादी झाल्यान शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी मंगळवार, दि. 2 रोजी रात्री मतदानानंतर मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, शहरातील एकूण 30 हजार 571 मतदारांपैकी 22 हजार 856 (74.76 टक्के) मतदारांनी मतदान केले होते. मात्र, रात्री उशिरा महसूल विभागाच्या एका कर्मचाऱ्याने ही आकडेवारी संगणकावर टाईप करताना चूक केली आणि ती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड केली. या चुकीच्या आकडेवारीत शहरातील एकूण 33 हजार 328 मतदारांपैकी 24 हजार 913 मतदारांनी मतदान केल्याचे दाखविण्यात आले होते. याची टक्केवारी 74.76 टक्के, अशीच दाखवली गेली. यामध्ये तब्बल 2 हजार 57 मतांचा मोठा फरक दिसून आला.

आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांनी ही गंभीर बाब तातडीने निवडणूक निर्णय अधिकारी राजशेखर लिंबारे यांच्या निदर्शनास आणून दिली. आकडेवारी चुकीची असल्याचे लक्षात येताच ती तातडीने वेबसाईटवरून हटवण्यात आली. दोन वेगवेगळे आकडे समोर आल्याने शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतदान यंत्रे ठेवलेल्या ठिकाणी फेरफार झाला असल्याची शंका व्यक्त करत महसूल व पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले. यावेळी मतदान यंत्रे असलेल्या परिसरात जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांवर पोलिस प्रशासनाने बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले.

घटनास्थळी दाखल झालेले प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन व उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण पाटील यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मतदान यंत्रे पाहण्याची तसेच सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली. मात्र, कायद्याच्या बंधनांमुळे मतदान यंत्रे पाहणे किंवा फुटेज देणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले.

आमदार जयंत पाटील यांनी घटनास्थळी येऊन घटनेची माहीि घेतली. अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी कर्मचाऱ्याच्या अनावधानामुळे ही चूक झाल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. पाटील यांनी अधिकाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या. यानंतर वादावर पडदा पडला.

यावेळी वैभव शिंदे, धैर्यशील शिंदे यांच्यासह सर्व उमेदवार व विविध पक्षांचे पदाधिकारी व अडीच ते तीन हजार कार्यकर्ते उपस्थित होते. घटनास्थळी राज्य राखीव पोलिस दलासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अंधश्रध्दा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागण

विरोधी गटाच्या उमेदवारांनी मतदानाच्या आदल्या रात्री शहरात लिंबू व भंडारा टाकून अंधश्रद्धा निर्माण केली असून, पोलिसांनी व निवडणूक आयोगाने संबंधितांवर अंधश्रद्धा कायद्यांतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार पाटील यांनी यावेळी केली.

तफावत आढळल्यास गंभीर परिणाम : जयंत पाटील

आमदार पाटील यांनी अधिकृत आकडेवारीत मतमोजणीवेळी तफावत आढळून आल्यास संबंधितांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा यावेळी दिला. त्यांनी स्क्रीनवर मतदान यंत्रे, सीसीटीव्ही फुटेज व बंदोबस्ताची पाहणी केली आणि प्रांत अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT