आष्टा : आष्टा - तासगाव रस्त्यावर चांदोली वसाहतीनजीक वेलकम हॉटेलसमोर दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जागीच ठार झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवार, दि. 22 रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली. आष्टा पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
प्रकाश भानुदास आवटे (वय 57, रा. आमणापूर ता. पलूस) असे ठार झालेल्याचे नाव आहे, तर उमेश ऊर्फ सचिन भरत लोहार (रा. आमणापूर, ता. पलूस), आदित्य प्रशांत विभुते व विश्वजित पाटील (दोघेही रा. अंकलखोप ता. पलूस) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत रूपेश नामदेव आवटे (वय 34, यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
प्रकाश आवटे व त्यांचे नातलग उमेश लोहार हे बागणी येथे काकांना भेटून दुचाकीवरून (क्र. एमएच 10 डीएफ 4308) आमणापूरकडे परतत होते. दरम्यान, आष्टा हद्दीतील चांदोली वसाहत भागात एका हॉटेलसमोरून येणारा दुचाकीस्वार (क्र. एमएच 10 डीके 0147) आदित्य प्रशांत विभुते (रा. अंकलखोप) हे समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करताना प्रकाश आवटे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रकाश आवटे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर उमेश लोहार, आदित्य विभुते आणि त्यांच्यासोबत असलेला विश्वजित पाटील हे तिघे जखमी झाले. या अपघातात दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले.