गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली. 
सांगली

सांगली : गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; १४ किलो गांजा जप्त

विटा- मायणी रस्त्यावर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

विटा : बॅगेतून गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना विटा पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून दोन लाख रुपये किंमतीचा १४ किलो गांजा जप्त करण्यात आला. राहुल संदिपान देवकुळे (रा.पळशी ता. माण, जि.सातारा) व महावीर बाबासाहेब चव्हाण (रा.लोणंद,ता.माळशिरस,जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई शनिवारी (दि.२५) दुपारी चारच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या सूचनेनुसार विटा पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पथक शनिवारी नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. यादरम्यान गुन्हे शाखेतील महेश संकपाळ यांना विटा ते मायणी रस्त्यावर पवई टेकाजवळ एकजण गांजा विकण्यासाठी येणार आहे, अशी माहिती मिळाली. त्यांनी याबाबत पोलीस निरीक्षक फडतरे यांना माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या पथकाने सापळा रचला. यादरम्यान मोटरसायकलवरून राहुल देवकुळे हा तरूण काळ्या रंगाची बँग पाठीवर अडकवून संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून आले. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची बँग तपासली असता बँगेत चार किलो गांजा आढळून आला.

त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. या घरात आणखी चार किलो गांजा मिळून आला. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपला आणखी एक साथीदार असून त्याचे नाव महावीर चव्हाण असल्याचे सांगितले. त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून ६ किलो गांजा जप्त केला. दोघांकडून एकूण १४ किलो गांजा व मोटरसायकल असा १ लाख ९५ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल विटा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालींदर पळे हे करत आहेत. दरम्यान, अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळाल्यास त्याची तात्काळ पोलीस ठाण्याला माहिती द्यावी. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT