आरेवाडी, केरेवाडीत सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. 
सांगली

सांगली : आरेवाडी, केरेवाडीत सशस्त्र दरोडा; सात जखमी

पोलिसांवर दगडफेक; प्रत्युत्तरादाखल गोळीबार, एकाला पकडले

पुढारी वृत्तसेवा

नागज : आरेवाडी व केरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) या गावात शनिवारी रात्री सहा दरोडेखोरांनी चार ठिकाणी सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी सातजणांना मारहाण करीत जखमी केले. सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला. पोलिसांनी दरोडेखोरांचा रात्री पाठलाग केला असता, त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी दरोडेखोरांच्या दिशेने गोळीबार केला. अखेर एका दरोडेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश आले, तर पाचजण पसार झाले. चारशिट्या भीमा शिंदे (वय 57, रा. बोलवाड, ता. मिरज) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्यांत आरेवाडी येथील दत्तू शिवाजी कोळेकर, त्यांच्या पत्नी हिराबाई, विजय शंकर बाबर व त्यांच्या पत्नी अनिता, केरेवाडीतील दिगंबर रावसाहेब करे यांचा समावेश आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसानी दिलेली माहिती अशी, शनिवारी रात्री आरेवाडी व केरेवाडी गावांच्यादरम्यान असलेल्या कोळेकर, बाबर व सूर्यवंशी वस्तीवर हातात कुर्‍हाड, चाकू व काठ्या घेऊन सहा दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. नागज ते आरेवाडीदरम्यान टेंभू योजनेच्या कालव्यालगत असलेल्या दत्तू शिवाजी कोळेकर यांच्या घराजवळ दरोडेखोर आले. त्यांची चाहूल लागताच जनावरे ओरडू लागली. जनावरे का ओरडत आहेत, म्हणून दत्तू कोळेकर घरातून बाहेर आले. यावेळी दरोडेखोरांनी कोळेकर यांना गराडा घातला. कोळेकर यांनी आम्हा गरिबाकडे काय आहे? असे दरोडेखोरांना म्हणताच, काय आहे, तुला दाखवतो, असे म्हणत दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच त्यांना घराजवळील झाडाला बांधून घातले. घरात जाऊन त्यांची पत्नी हिराबाई यांना जबर मारहाण केली. त्यांचे दागिने काढून घेतले. झोपलेल्या आठ वर्षाच्या नातवाला जवळच्या खोलीत फेकले. बेडमधील साहित्य विस्कटले तसेच दोन कपाटे फोडली. घरातील चार तोळे सोन्याचे दागिने व पन्नास हजार रुपये रोख रक्कम, पितळेच्या समई व आरतीचे ताट दरोडेखोरांच्या हाताला लागले. सुमारे तासभर कोळेकर यांच्या घरात दरोडेखोरांचा धिंगाणा सुरू होता. झाडाला बांधलेल्या दत्तू कोळेकर यांना पुन्हा घरात कोंडून दरोडेखोर पसार झाले.

त्यानंतर दरोडेखोरांनी आरेवाडी ते केरेवाडी रस्त्यालगत विजय बाबर यांच्या घराकडे मोर्चा वळविला. त्यांची आई घराबाहेर आली. चोरट्यांनी संधी साधत बाबर यांच्या घरात प्रवेश केला. त्यांच्या पत्नी अनिता यांच्या गळ्यातील एक तोळे सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. त्यांना कानातील दागिने मागताच, त्या काढून देते म्हणून आत गेल्या व त्यांनी चटणी घेऊन त्यांच्या डोळ्यात फेकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विजय बाबर दरोडेखोरांना चकवा देत घरातून बाहेर पळाले व त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. दंगा वाढताच दरोडेखोरांनी तेथून पलायन केले.

केरेवाडी येथील दिगंबर रावसाहेब करे (मूळ रा. नंदेश्वर, ता. मंगळवेढा ) यांच्या घरात शिरून त्यांना मारहाण करून एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली. आरेवाडी येथील ज्ञानदेव सूर्यवंशी यांच्या घरातील दोन साड्यांची पिशवी दरोडेखोरांनी पळवली. परिसरात आरडाओरडा सुरू होताच दरोडेखोर मोटरसायकलवरून रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून मिरजेच्या दिशेने पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच मिरजचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, जतचे उपअधीक्षक सुनील साळुंखे, कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांनी तत्काळ दरोडेखोरांची शोधमोहीम सुरू केली. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते.

पोलिसांचा थरारक पाठलाग अन् गोळीबार

दरोडेखोर रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून मिरजेच्या दिशेने निघाल्याचे कळताच उपअधीक्षक प्रणिल गिल्डा आणि पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांच्यासह पोलिस पथकाने त्यांचा पाठलाग केला. दरम्यान, कुची ते नरसिंहगाव दरम्यान दरोडेखोरांनी मोटरसायकली टाकून शेतातून पळायला सुरुवात केली. पोलिसांनी रात्रीच्या अंधारात सुमारे दीड किलोमीटर दरोडेखोरांचा पाठलाग केला. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी प्रणिल गिल्डा यांच्या पथकाने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. एक दरोडेखोर पोलिसांच्या हाताला लागला. इतर पाचजणांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT