नागज : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील धनगरी गजनृत्याने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात राजधानी दिल्लीतील प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमात देशभरातील विविध लोककलांसह सांगलीचे गजनृत्य, कोल्हापूरचे लेझीम नृत्य, मुंबईची लावणी आणि कोळीनृत्य, कुडाळचा दशावतार, नागपूरचा ढोल-ताशा व नाशिकचे सोंगी मुखवटे या महाराष्ट्रातील लोककलेने दिल्ली गाजवली.
नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनच्या सांस्कृतिक सभागृहात 'ॲट होम' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांगली जिल्ह्यातील बिरुदेवनगरी आरेवाडी येथील गजनृत्याने ढोलांचा गजर करत धमाल केली.
मराठी लोककलांनी दणाणले महाराष्ट्र सदन
१७ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र सदन नवी दिल्ली व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'चतुरंग' या सांस्कृतिक व सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील लोककलांचा आस्वाद घेतला. यावेळी महाराष्ट्र सदनच्या आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल यांनी नागपूर केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांचा सत्कार करत कलाकारांचे कौतुक केले.
राष्ट्रपती भवनच्या सांस्कृतिक सभागृहात देशभरातील विविध लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. दरम्यान, ४० मिनिटांच्या शो मध्ये १६ कलांचे सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या धनगरी ढोलांचा दणदणाट व तुतारीचा नाद चांगलाच घुमला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘बहुत बढिया’, असे म्हणत सर्व कलाकारांचे कौतुक केले.