कवठेमहांकाळ : येथील तातडीच्या विशेष सर्वसाधारण सभेत संचालक आणि शेतकरी सभासदांनी बाजार समितीच्या त्रिभाजनाला विरोध असल्याचा ठराव एकमताने हात वर करून मंजूर केला. 
सांगली

Sangli News : त्रिभाजनाला शेतकऱ्यांचा ठाम विरोध

बाजार समितीच्या तातडीच्या सभेत एकमताने ठराव : तीन तालुक्यांसाठी एकाच बाजार समितीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथील श्रीराम मंगल कार्यालयात शनिवारी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची तातडीची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत बाजार समितीच्या प्रस्तावित त्रिभाजनाला संचालकांसह शेतकरी सभासदांनी तीव्र विरोध दर्शविला. त्रिभाजनास विरोध करणारा आणि मिरज, कवठेमहांकाळ व जत या तीन तालुक्यांसाठी सध्याची एकच कृषी उत्पन्न बाजार समिती कायम ठेवावी, अशी मागणी करणारा ठराव शेकडो सभासदांनी हात वर करून एकमताने मंजूर केला.

ही विशेष सभा बाजार समितीचे सभापती आनंदराव यशवंत नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरुवातीला सचिव महेश चव्हाण यांनी त्रिभाजनासंदर्भात शेतकरी सभासदांचा अभिप्राय मागवणारे परिपत्रक उपस्थितांना दाखवले. यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर, माजी सभापती सुजय शिंदे यांनी राज्य सरकारच्या प्रत्येक तालुक्यासाठी एक बाजार समिती करण्याच्या धोरणाला विरोध दर्शवणारा ठराव मांडला. या ठरावाला उपस्थित शेकडो शेतकऱ्यांनी एकमुखाने पाठिंबा दिला.

तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांचे व्यवहार, शेतीमालाची आवक-जावक आणि बाजारपेठेचे स्थैर्य लक्षात घेता सध्याची रचना कायम ठेवणेच शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचा सूर सभेत उमटला. त्रिभाजन झाल्यास बाजार समितीच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

या सभेला माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी संबोधित केले. तसेच माजी आमदार विक्रम सावंत, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दादासाहेब कोळेकर, जिल्हा परिषद सदस्य संजय बनसोडे, पंचायत समितीचे उपसभापती वामन कदम, शिवसेना नेते बजरंग पाटील, पंचायत समिती सदस्य दिलीप झुरे, रविकिरण घागरे, संदीप पाटील, टी. व्ही. पाटील, उपसभापती रावसाहेब पाटील, संचालक रामचंद्र पाटील, बापूसाहेब बुरसे, स्वप्निल शिंदे, महेश पवार, बाबासाहेब माळी, बिराप्पा शिंदे, शशिकांत नागे, रमेश पाटील, मारुती बंडगर, शकुंतला बिराजदार, कुसुम कोळेकर, सचिव महेश चव्हाण यांच्यासह संचालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT