सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा मार्केट यार्डातील प्लॉटची समितीच्या पूर्वपरवानगीशिवाय परस्पर विक्री केली. या व्यवहारात आर्थिक व्यवहार झाला असून, याबाबत लेखी तक्रार करूनही बाजार समिती प्रशासनाकडून कारवाईस जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याचा आरोप तक्रारदार अनिकेत पाटील यांनी केला आहे.
त्यांनी केलेल्या तक्रारीत माहिती आहे की, सिटी सर्व्हे क्रमांक ८२५ मधील ही जागा बाजार समितीच्या मालकीची आहे. ज्ञानदेव घुबडे यांच्या निधनानंतर २०२१ मध्ये वारसदार अशोक घुबडे यांच्या नावे नोंद झाली. मात्र, बाजार समितीची पूर्वपरवानगी न घेता अशोक घुबडे यांनी पत्नी शर्मिला यांच्या संमतीने ही जागा नातेवाइकाला विकल्याचा आरोप आहे. या व्यवहारात शासनाची दिशाभूल केल्याचेही म्हटले आहे. बाजार समितीचे नुकसान होत असल्याची तक्रार असूनही कारवाई होत नसल्याने संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणात महापालिकेतील एका माजी नगरसेवकाचा हस्तक्षेप असल्याची चर्चा आहे.
सखोल चौकशी करण्याची मागणी
विशेष म्हणजे, नगरभूमापन अधिकाऱ्यांनी सुनावणीनंतर संबंधित फेरफार नोंद नामंजूर केली आहे. तरीही २५ मार्च २०२६ रोजी सचिवांना लेखी तक्रार देऊनही कारवाई झालेली नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून विक्री व्यवहारातील संबंधितांवर तसेच दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.