मिरज तालुक्यातील अंकली येथे सोमवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. शीतल धनपाल पाटील (वय २५) हा तरुण मिरवणुकीदरम्यान झालेल्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेला असताना त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.
गंभीर जखमी अवस्थेत त्याला तत्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी शीतल पाटील यांचे पार्थिव अंकली गावात आणण्यात आले. या वेळी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला.
शीतलच्या अंत्ययात्रेदरम्यान गावात मोठा तणाव निर्माण झाला. ग्रामस्थांनी शीतलचे पार्थिव थेट आरोपींच्या घरासमोर ठेवत कडक कारवाईची मागणी केली. त्यामुळे काही काळ गावात परिस्थिती गंभीर झाली होती.
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित विकास बंडू घळगे, क्षितिज ऊर्फ आप्पा शशिकांत कांबळे आणि आदित्य शंकर घळगे या तिघांना अटक केली असून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या कारवाईनंतर ग्रामस्थांचा रोष काहीसा शमला आणि शीतलवर अखेर अंत्यसंस्कार पार पडले. सध्या अंकली गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.