सांगली : रत्नागिरी ते नागपूर महामार्गावर भरधाव वेगात मोटरसायकल चालवून संरक्षक कठड्याला धडकून रस्त्यावर पडून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवार दि. 16 जून रोजी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास अंकली (ता. मिरज) जवळ झाला. प्रदीप नरसगोंडा पाटील (वय 49, रा. जयसिंगपूर) असे मृत दुचाकीस्वाराने नाव आहे. याप्रकरणी सूरज अजितकुमार भेंडवडे (रा. हुपरी) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पाटील आपल्या कुटुंबीयांसह जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथे राहत होते. सोमवारी मध्यरात्री ते मोपेड दुचाकी (क्र. एमएच 51 डी 6411) वरून रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरून निघाले होते. पाटील यांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या संरक्षक कठड्याला जोराची धडक दिली. यामध्ये मुख्य महामार्गावरून सर्व्हिस रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि कपाळाला गंभीर दुखापत झाली होती. यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसात नोंद आहे.