सांगली

Sangli Crime: अंजनीतील बैलगाडा शर्यतीत हाणामारीप्रकरणी २५ जणांवर गुन्हा

तुंबळ मारामारीत तिघे गंभीर जखमी; मोठा अनर्थ टळला

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : अंजनी (ता. तासगाव) येथे बैलगाडा शर्यतीप्रसंगी झालेल्या तुंबळ हाणामारीप्रकरणी १५ जणांसह अन्य १० अनोळखी, अशा एकूण २५ जणांविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भगवान ओंबासे (वय ४९) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

या हाणामारीत तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. अजित अशोक शेजूळ, इंद्रजित दादासाहेब शेजूळ व प्रमोद थोरात अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये प्रमोद थोरात, समाधान नंदकुमार महाडिक, साहिल सुनील शिवशरण (तिघे रा. भिलवडी स्टेशन), मयूर थोरात, राहुल थोरात (दोघे रा. तासगाव), अमेय ऊर्फ अमेक्स पाटील (रा. येळावी, ता. तासगाव), अजित अशोक शेजूळ, इंद्रजित दादासाहेब शेजूळ (दोघे रा. गुंडेवाडी, मालगाव, ता. मिरज), सुमित संतोष जाधव, प्रशांत आप्पासाहेब मदने, अतुल विठ्ठल मदने (तिघे रा. निमज, ता. कवठेमहांकाळ), अजित मुरगप्पा कटीक (रा. मालगाव), सुखदेव कट्टेकर, अजित कट्टेकर, गिरीश आणि इतर १० अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वज्रचौंडे (ता. तासगाव) येथील कैलास टोकले यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दि. ३० जूनरोजी सायंकाळी अंजनी येथील हेलिकॉप्टर मैदानावर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीदरम्यान जिंकणाऱ्या बैलगाडीचा क्रमांक काढण्याच्या कारणावरून दोन बैलगाडा मालक व त्यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. दोन्ही बाजूंचे समर्थक आक्रमक बनल्याने या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमवून हातात काठ्या, लाठ्या आणि दगड घेऊन एकमेकांवर हल्ला केला. या तुंबळ हाणामारीत तिघेजण गंभीर, तर अन्य काही जण किरकोळ जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सौम्य लाठीमार करून आक्रमक जमावाला पांगवले. पोलिस आक्रमक होत असल्याने पाहून अनेकांनी वाहने घटनास्थळीच टाकून पलायन केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. तासगाव पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT