संतप्त लोक घुसले पोलिस अधीक्षक कार्यालयात 
सांगली

Sangli Crime : संतप्त लोक घुसले पोलिस अधीक्षक कार्यालयात

नशेखोरांचा बंदोबस्त करण्यास जमत नसेल, तर आम्ही करतो; संतप्त नागरिकांचा पोलिसांना इशारा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली शहरातील लिमये मळा येथे नशेखोरांनी क्रांतिकुमार शेडबाळे यांचा खून केल्याच्या निषेधार्थ सांगली शहरातील आणि धामणीमधील नागरिकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. यावेळी पोलिस अधीक्षकांना भेटण्यासाठी काही निवडक नागरिकांना सोडण्यात येत असल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातच गोंधळ घातला. त्यानंतर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी संतप्त नागरिकांची भेट घेऊन नशेखोर हल्लेखोरांवर व नशेखोरांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.

शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सांगली शहरातील लिमये मळा येथे क्रांतिकुमार शेडबाळे या 55 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून नशेखोर हल्लेखोरांनी त्यांचा निर्घृणपणे खून केला होता. तसेच त्यांच्या मुलावर देखील दगडाने हल्ला केल्याने सुयश शेडबाळे हा देखील जखमी आहे.

क्रांतिकुमार शेडबाळे हे धामणी येथील रहिवासी होते. ते शनिवारी रात्री स्फूर्ती चौकाकडे त्यांच्या दुचाकीवरून निघाले होते. यावेळी त्यांच्या दुचाकीचा उजेड तेथे नशा करत बसलेल्या तीन हल्लेखोर संशयितांच्या चेहऱ्यावर पडला. यावेळी चेहऱ्यावर का उजेड पाडला? असा जाब तिघा हल्लेखोरांनी क्रांतिकुमार शेडबाळे यांना विचारला. यावेळी त्यांच्यात वादावादीचा प्रकार घडला. या झटापटीमध्ये क्रांतिकुमार शेडबाळे यांचा मोबाईल त्या ठिकाणी पडला होता. क्रांतिकुमार हे रात्री घरी गेल्यानंतर त्यांना त्यांचा मोबाईल घटनास्थळी पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ते त्यांचा मुलगा सुयशला घेऊन मोबाईल शोधण्यासाठी पुन्हा लिमये मळा येथे घटनास्थळी गेले होते. तेथे ते मोबाईल शोधत असताना त्याच तीन हल्लेखोर संशयितांनी क्रांतिकुमार यांना, पुन्हा या ठिकाणी का आलास? असा जाब विचारला. त्यावेळीही त्यांच्यात वादावादीचा प्रकार घडला. त्यानंतर एका अल्पवयीन हल्लेखोरासह तिघांनी क्रांतिकुमार यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा निर्घृणपणे खून केला होता. त्यानंतर सुयश यालाही दगडाने मारहाण करून जखमी केले होते.या खूनप्रकरणी तिघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्यांची न्यायालयासमोर ओळखपरेड करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

दरम्यान, क्रांतिकुमार शेडबाळे यांच्या खून प्रकरणातील संशयितांवर तातडीने गुन्हा दाखल करावा व लिमये मळा परिसरात नशा करण्यासाठी येणाऱ्या तरुणांवर कारवाई करावी, या मागणीसाठी लिमये मळा व धामणी परिसरातील नागरिक विश्रामबाग पोलिस ठाण्यासमोर आले होते. परंतु पोलिसांकडून ओळखपरेड झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल असे सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यासमोर तासभर ठिय्या मारून आंदोलन केले. त्यानंतर नशेखोरीविरोधात निवेदन देण्यासाठी पोलिस अधीक्षक यांना भेटण्यासाठी सर्व नागरिक पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले. यावेळी काही मोजक्याच नागरिकांना पोलिस अधीक्षकांची भेट घेता येईल, असे सांगितल्यामुळे पोलिस अधीक्षक कार्यालयात घुसलेल्या नागरिकांनी गोंधळ घातला.

पोलिस अधीक्षक कार्यालयात सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता. यानंतर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी संतप्त नागरिकांची भेट घेतली. यानंतर नागरिकांनी नशेखोरांविरोधात जणू पाढाच वाचला. क्रांतिकुमार शेडबाळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या नशेखोरांवर तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली. तसेच लिमये मळा परिसर आणि धामणी परिसरामध्ये दररोज नशा करण्यासाठी काही तरुण येत आहेत, रात्रीच्यावेळी शेतामध्ये पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा नशेखोर तरुणांवर कारवाई करावी, तसेच या ठिकाणी पोलिस चौकी उभारावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली.

यावर सर्व उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिल्यानंतर तणाव निवळला. परंतु पोलिस अधीक्षक कार्यालयात सुमारे तासभर सुरू असणाऱ्या या आंदोलनामुळे एकच गोंधळ उडाला होता. या आंदोलनामध्ये विश्रामबाग परिसरातील लिमये मळा आणि धामणीमधील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांकडून पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना निवेदन देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT