नामफलकासाठी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचा ठिय्या 
सांगली

Sangli News : नामफलकासाठी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचा ठिय्या

प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी; पंचायत समिती आवारात पोलिस फौजफाटा

पुढारी वृत्तसेवा

मिरज : मिरज पंचायत समितीच्या नूतन वास्तूला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे व सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृह असा नामफलक लावावा, या मागणीसाठी पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराबाहेर मंगळवारी आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी तीव्र ठिय्या आंदोलन केले. यावेळी संतप्त आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पंचायत समितीच्या सभागृहाला आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी यापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक लावला होता. तसेच पूर्वी भाजप आणि प्रशासनाच्यावतीने आयोजित कार्यक्रमादरम्यान सभागृहाला 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृह' असे नामकरण करून फलक लावला होता. मात्र, प्रशासनाकडून हे दोन्ही फलक काढण्यात आल्याने आंदोलकांनी प्रशासनाविरोधात मोर्चा उघडला होता.

मंगळवारी पुन्हा आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जमा झाले. त्यांनी दिवसभर आंदोलन करत परिसर दुमदुमून सोडला. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव मुख्य गेट बंद करून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आंदोलनाची तीव्रता पाहून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण जाधव यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेदरम्यान पंचायत समितीतील एका कक्ष अधिकाऱ्याच्या वर्तनामुळे वातावरण काही काळ तापले होते. मात्र, किरण जाधव यांनी मध्यस्थी करत आंदोलकांची समजूत काढली आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासोबत बैठकीचे आयोजन केले.

त्यानंतर आंदोलकांनी जिल्हा परिषद मुख्यालयात जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे व इतर अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. आगामी सर्वसाधारण सभेत याबाबत कायदेशीर ठराव मंजूर करून दोन्ही नामांतराचे फलक लावण्याचे सकारात्मक आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र, जोपर्यंत दोन्ही नावांचे अधिकृत फलक लावले जात नाहीत, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा आंदोलनाचे नेते तुषार खांडेकर व शिवसेना नेते तानाजी सातपुते यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT