Crime News Pudhari Photo
सांगली

Sangli Crime : आळते येथे दोन भाच्यांवर हल्ला

लग्न मोडल्याच्या रागातून कृत्य : मामासह चौघांवर तासगाव पोलिसांत गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : आळते (ता. तासगाव) येथे लग्न मोडल्याच्या कारणावरून जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन भाच्यांवर मामासह चौघांनी खुरपे, दगड व काठीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना आळते (ता. तासगाव) येथे रविवारी रात्री घडली. या मारहाणीत दोघे भाऊ जखमी झाले असून, याप्रकरणी लखन सुनील पवार (वय २७, सध्या रा. मोराळे, ता. पलूस, मूळ रा. खेराडे-वांगी, ता. कडेगाव) यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लखन पवार यांच्या मेहुण्याच्या मुलीचे लग्न १९ जून रोजी ठरणार होते; मात्र लग्नाच्या आदल्या दिवशी ते मोडले. या गोष्टीचा राग पिंटू भोसले व त्यांच्या मुलांना होता. २७ सप्टेंबर रोजी लखन पवार यांचे वडील सुनील पवार पत्नीसह राजेवाडी (ता. माण, जि. सातारा) येथे गेले होते. तेथून परत येत असताना कातर-खटाव येथे मामा पिंटू भोसले आणि करण भोसले यांनी त्यांना गाठून लग्न मोडल्याचा राग व्यक्त करत धमकी दिली. ही माहिती सुनील पवार यांनी फोनवरून आपल्या मुलांना दिली.

वडिलांना दिलेली धमकी आणि लग्न मोडल्याच्या वादाबाबत विचारणा करण्यासाठी रविवारी रात्री लखन पवार व त्यांचा भाऊ संतोष पवार हे आळते येथील मामा पिंटू भोसले यांच्या घरी गेले. तेथे जाब विचारल्याचा राग येऊन पिंटू भोसले यांनी दोघांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. या दरम्यान बबलू प्रकाश पवार (रा. मणेराजुरी) याने खुरप्याने लखन यांच्या उजव्या कानावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. करण भोसले याने दगडाने डाव्या पायाच्या बोटावर, तर लखन भोसले याने काठीने हात, पाय व पाठीवर मारहाण केली. तसेच चौघांनी मिळून संतोष पवार यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या घटनेनंतर जखमींवर उपचार करून तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंटू भोसले, करण भोसले, लखन भोसले (तिघे रा. आळते) आणि बबलू प्रकाश पवार (रा. मणेराजुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास तासगाव पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT